नवी दिल्ली: गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडीची चर्चा सुरू आहे. मात्र या आघाडीला मूर्त स्वरुप आलेलं नाही. याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी एक ट्विट केलं आहे. आपसाठी दिल्लीत 4 जागा सोडायला तयार असल्याचं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मात्र आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यू टर्न घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
'आप आणि काँग्रेसनं आघाडी केल्यास दिल्लीत भाजपाचा पराभव होऊ शकतो. काँग्रेस आपसाठी 4 जागा सोडण्यास तयार आहे. पण केजरीवालांनी पुन्हा एकदा घूमजाव केलं आहे. आमचे दरवाजे आताही उघडे आहेत. पण वेळ निघून चालली आहे,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. आप आणि काँग्रेसमध्ये आघाडीची बोलणी सुरू झाल्यानंतर राहुल यांनी प्रथमच यावर जाहीर भाष्य केलं. आप आणि काँग्रेसमध्ये निष्फळ ठरणाऱ्या चर्चांचं खापर राहुल यांनी केजरीवालांवर फोडलं. भाजपाला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आपला दिल्लीबाहेरदेखील काँग्रेससोबत आघाडी करायची आहे. दिल्लीबाहेर 18 जागा मिळाव्यात, अशी आपची मागणी आहे. पंजाब, हरयाणा आणि छत्तीसगडमध्ये आघाडी करण्यास आप उत्सुक आहे. तर काँग्रेसला आपसोबत केवळ दिल्लीतच आघाडी करायची आहे. दिल्लीत लोकसभेच्या सात जागा आहेत. या सातही जागा भाजपानं गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकल्या होत्या.