तासगाव : काश्मिरमधील स्थिती अतिशय गंभीर आहे. तेथील नेते फारूख अब्दुल्ला काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान हवा, असे विधान करत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत. कोणत्याही स्थितीत देशाला दोन पंतप्रधान नको आहेत असे म्हणत पवार व राहुल गांधी यांचा देशाच्या विभाजनाचा प्रयत्न करत आहेत, असा घणाघाती आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी केला. तासगाव येथील विद्यानिकेतन महाविद्यालयाच्या मैदानावर भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. शरदराव आणि कंपनीने पंधरा वर्षांच्या काळात ७२ हजार कोटींचा गैरव्यवहार सिंचन योजनेतून केल्याचे सांगत शहा यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी संजय पाटील यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शहा म्हणाले, राहुल गांधी आणि शरद पवार देशातील गरिबी हटवण्याची भाषा करत आहेत. परंतु माझा त्यांना प्रश्न आहे की, त्यांनी आतापर्यंत गरिबी हटवण्यासाठी काय केले, हे आधी सांगावे. गेल्या पाच वर्षात आम्ही ७ कोटी कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजनेचे कनेक्शन दिले. ८ कोटी कुटुंबांना शौचालये दिली. अडीच कोटी कुटुंबांना घरे दिली. २ कोटी ३५ लाख कुटुंबांना वीज दिली. तर ५० कोटी जनतेला आयुष्यमान भारत योजनेतून प्रत्येकी ५ लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण दिले. देश काँग्रेसच्या हातात सुरक्षित राहू शकत नाही, असं शहा म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशाचे संरक्षण करु शकतात. त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करुया. केंद्रात पुन्हा सत्ता आल्यानंतर काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंतचे सर्व घुसखोर देशातून हाकलून देऊ. ४० लाखांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांचा जीएसटी माफ करणार आहे. ६० लाखांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना आयकरातून मुक्ती देणार आहे.भाजपा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचंही कौतुक केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३५ लाख शेतकऱ्यांना ३७ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. बाहेरील उद्योगपतींनी राज्यात ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून ६ हजार कोटी रुपये खर्च केले. राज्यातील १२ हजार गावांना पाणीदार बनवले. गेल्या अनेक वर्षापासून सवर्ण समाज आरक्षण मागत होता. हा प्रश्न काँग्रेसला सोडवता आला नाही. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेत तरतूद करुन सवर्णांना १० टक्के आरक्षण दिले.
एअर स्ट्राईकसाठी शिवाजी महाराजांचा गनिमी कावायूपीए सरकारने दहा वर्षे पाकिस्तानच्या बाबतीत मवाळ भूमिका घेतली. यामुळे शेफारलेल्या पाकिस्तानने उरीत हल्ला केला. त्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला. तरीही पाकिस्तान सुधारला नाही. पुलवामामध्ये दहशतवादी घडवून आणला. या हल्ल्यात देशाचे ४० जवान शहीद झाले. यानंतर मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा या तंत्राचा अवलंब केला. सीमेवर सैन्य तैनात ठेवले आणि हवाई दलामार्फत हल्ला करुन बालाकोटमधील दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला.या सभेला गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आमदार सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, सुरेश हळवणकर, अजितराव घोरपडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सांगलीच्या महापौर संगीता खोत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.