देशद्रोही नेत्यांच्या हातात सत्ता देणार का?; उद्धव ठाकरेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 09:59 PM2019-04-12T21:59:01+5:302019-04-12T22:01:32+5:30
खामगावमधील सभेत राहुल गांधी, शरद पवारांवर शरसंधान
खामगाव : पुलवामा हल्ल्यानंतर सैनिकांच्या शौर्यावर अविश्वास दाखवत मोदींजींना टार्गेट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशद्रोही नेत्यांच्या हाताता सत्ता देणार काय? असा सवाल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजप युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ खामगावमध्ये आयोजीत सभेत ते बोलत होते.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टिका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, हा जाहीरनामा फसवा आहे. आम्ही ३७० कलम काढणार नाही अशी भाषा बोलली जात आहे. तर शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेतासुद्धा त्यांच्या जाहीरनाम्याला पाठिंबा देत आहे. हा देशद्रोह नाही का, याचा जनेतेने विचार करावा. मोदी हे दूरदृष्टी असणारे देशभक्त नेते आहेत. मोदींच्या मजबूत हातात आपला देश देण्याची गरज आहे. पाकड्यांना धडा शिकवायचा असेल तर मोदींना पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून द्यावेच लागेल. नाहीतर या देशाचे वाटोळे करण्याचे आघाडी सरकारचे स्वप्न पूर्ण होण्याची भिती आहे.
देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार हवं असेल, तर महायुतीला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. विदर्भासह राज्यात सर्वच ठिकाणी युतीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होणार आहेत. भारताला इटली समजण्याचा प्रयत्न करू नका. कन्हैया, दाऊद सारख्यांना वाचवण्यासाठी राहुल गांधीना देशद्रोहाचा कायदा रद्द करायचा आहे. हे प्रत्येकाने समजून घेण्याची गरज आहे. राममंदिर बांधण्याचे स्वप्न आम्ही निश्चित पूर्ण करू. पण त्याला विरोध करणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.