नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातलं मतदान संपताच एक्झिट पोल्सचे अंदाज समोर आले. जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला. यानंतर आम आदमी पार्टीनं पुन्हा एकदा ईव्हीएमला लक्ष्य केलं. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएममधील पडताळणी चुकल्यास निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी केली. दिल्लीमध्ये आपचं सरकार आहे. मात्र बहुतांश एक्झिट पोल्समध्ये दिल्लीत आपला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. देशाच्या राजधानीत भाजपाला निर्विवाद यश मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर आपनं एक्झिट पोल्स आणि ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'खरा खेळ ईव्हीएमच्या माध्यमातून खेळला जाणार का? पैसे घेऊन एक्झिट पोल केले जातात का? बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, पश्चिम बंगाल. या सगळ्याच राज्यांमध्ये भाजपा विजयी होणार, हे कसं शक्य आहे?'', असे प्रश्न सिंह यांनी ट्विटमधून उपस्थित केले आहेत.
...तर निवडणूकच रद्द करा; एक्झिट पोलनंतर आपची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 4:41 PM