राहुल गांधी ना आपल्यांचे झाले, ना परक्यांचे- स्मृती इराणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 04:56 PM2019-04-04T16:56:35+5:302019-04-04T16:56:47+5:30
राहुल गांधींनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर इराणींचं शरसंधान
अमेठी: वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी निशाणा साधला. राहुल गांधी ना आपल्यांचे झाले, ना परक्यांचे अशा शब्दांमध्ये इराणींनी काँग्रेस अध्यक्षांवर टीका केली. राहुल गांधींनी आजपर्यंत कोणाला साथ दिली, असा प्रश्न विचारत एकेकाळचे त्यांचे साथीदार त्यांच्यापासून दुरावल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इराणी सध्या अमेठीच्या दौऱ्यावर आहेत.
राहुल यांनी आजपर्यंत कोणाला साथ दिली, असा प्रश्न अमेठीतील भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणींनी विचारला. 'महाआघाडीनं त्यांची साथ सोडली. ममताजी त्यांना महत्त्व देत नाहीत. डाव्यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला. ज्यांच्यासोबत त्यांनी सत्तासुख भोगलं, ते सर्वच आज राहुल गांधींपासून दूर गेले आहेत. राहुल गांधी ना आपल्यांचे झाले, ना परक्यांचे,' अशी घणाघाती टीका इराणींनी केली.
#WATCH Smriti Irani in Raebareli: Rahul ji ne aaj tak kis ka sath nibhaya? Mahagathbandhan ne unka sath chhod diya,Mamata ji unko tawajo nahi deti,aaj Left ki peeth pe chura bhonk diya, jin ke sahare vo satta ka sukh bhog chuke hain, to Rahul Gandhi na apno ke huye na parayon ke. pic.twitter.com/NmxHqziCzk
— ANI UP (@ANINewsUP) April 4, 2019
राहुल गांधींनी आज केरळच्या वायनाडमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. यावरुन इराणींनी राहुल यांना लक्ष्य केलं. राहुल यांनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरुन अमेठीतील जनतेचा अपमान केल्याचं त्यांनी म्हटलं. 'राहुल गांधी अमेठीत अपयशी ठरल्यानंतर आता वायनाडमधील जनतेला फसवण्यासाठी जात आहेत. त्यांना अमेठीचा विकास करता आला नाही. इथल्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना कराला लागत आहे. आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना मदत दिली. मात्र राहुल यांनी 15 वर्षे शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही,' अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसचा जाहीरनामा आणि त्यातील न्याय योजनेवरदेखील स्मृती इराणींनी तोंडसुख घेतलं. 'काँग्रेसला जाहीरनामा तयार करता येत नाही. राहुल गांधींची न्याय योजना गरिबांची फसवणूक आहे. अमेठीतील जनता यंदा भाजपाला मतदान करणार नाही. प्रियंका गांधींच्या राजकारणातील आगमनानं कोणताही फरक पडणार नाही. त्यांच्या प्रचारामुळे परिस्थितीत जराही बदल होणार नाही,' असंदेखील स्मृतींनी म्हटलं.