लखनऊ: समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्यावर पातळी सोडून टीका केली. खान यांनी जया प्रदा यांच्या अंतर्वस्त्रावर भरसभेत टिप्पणी केली. त्यावेळी व्यासपीठावर समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव उपस्थित होते. खान यांच्या विधानावर चौफेर टीका होत आहे.'मी तिला (जया प्रदा) रामपूरमध्ये आणलं. मी कोणालाही तिला स्पर्श करु दिला नाही, याचे तुम्ही साक्षीदार आहात. मात्र तिचा खरा चेहरा समजायला मला 17 वर्षे लागली,' असं आझम खान म्हणाले. यानंतर पुढे बोलताना त्यांनी आझम खान यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. 'भाजपा उमेदवार, रामपूरमध्ये एक दानव असल्याचं तुम्ही पूजा केल्यानंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं. त्या दानवाला संपवायचं काम मला करायचं आहे, असं तुम्ही म्हणाला होतात. मला दानव या शब्दाचा अर्थ माहीत नाही. माझ्या एका मित्रानं मला दानव शब्दाचा अर्थ सांगितला,' असं आझम खान म्हणाले. खान रामपूरमध्ये जया प्रदांविरोधात निवडणूक लढवत आहेत.आझम खान यांच्या विधानावर संपूर्ण देशभरातून टीका झाली. सर्वच स्तरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. आझम खान यांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी केली. केवळ राजकीय फायद्यासाठी अशी भाषा वापरली जाऊ नये. खान यांनी वापरलेली भाषा म्हणजे आमच्या मातांचा अपमान आहे. हे विधान केवळ जया प्रदा यांच्यावर केलेलं नाही, तर कोट्यवधी महिलांवर केलेलं आहे, अशा शब्दांमध्ये शहांनी खान यांच्यावर सडकून टीका केली.
आझम खान यांनी पातळी सोडली; जया प्रदांवर हीन दर्जाची टिप्पणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 8:17 PM