परभणी : गेल्या ३० वर्षापासून शिवसेनेला निवडून देऊनही जिल्हा विकासापासून कोसो दूर राहिला आहे. त्यामुळे झालेल्या चुकांचा हिशोब करण्याची वेळ आली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी तालुक्यातील जाहीर सभेमधून शिवसेनेवर केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. मोदी गेल्या पाच वर्षांतील विकासकामांवर का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण, टाकळी बोबडे येथे रविवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. वर्धा, गोंदिया, नांदेड या ठिकाणी झालेल्या तिन्ही सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्यावरच खालच्या पातळीत टीका चालवली आहे. इतिहास पूर्णपणे झाकून स्वत:ची प्रतिमा उंचावण्याची ते प्रयत्न करीत आहेत. प्रत्यक्ष गेल्या ५ वर्षातील विकासकामांवर ते का बोलत नाहीत? स्वत:च्या अजेंड्यावर का? बोलत नाहीत, त्यांचा खोटारडेपणा जनतेने ओळखला आहे. त्यामुळे त्यांच्या भूलथापांना आता कोणीही बळी पडणार नाही, अशी टीका त्यांनी केली. जयंत पाटील यांनी भाजपासोबतच शिवसेनेवरही शरसंधान साधलं. ३० वर्षांपासून जिल्ह्यातील जनतेने शिवसेनेचा खासदार निवडून दिला. तरीही जिल्ह्याचा विकास झालेला नाही. त्यामुळे झालेल्या चुकांचा हिशोब करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्याच्या अधोगतीला शिवसेनेबरोबरच भाजपाही तेवढीच जबाबदार आहे. शिवसेनेला ३० वर्षे दिलीत. आता एकदा राष्ट्रवादीला संधी द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी, आ. मधुसूदन केंद्रे, आ. विजय भांबळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, उमेदवार राजेश विटेकर, माजी आ. सुरेश देशमुख, माजी खा. सुरेश जाधव, अॅड. स्वराजसिंह परिहार, प्रताप देशमुख, भावनाताई नखाते, नंदा राठोड, संतोष बोबडे, किरण सोनटक्के, रमाकांत कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
'मोदी पाच वर्षांतील विकासकामांवर का बोलत नाहीत?'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 10:01 PM