स्वत:च्या अपयशाचं खापर दुसऱ्यांवर फोडणारे मोदी पहिलेच पंतप्रधान; काँग्रेसचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 12:31 PM2019-05-09T12:31:59+5:302019-05-09T13:07:24+5:30
काँग्रेसकडून मोदींना बोफोर्सवर चर्चा करण्याचं खुलं आव्हान
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधीवर सातत्यानं टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरकाँग्रेसनं जोरदार पलटवार केला आहे. भाजपा राफेलवर चर्चा करण्यास तयार असल्यास आम्ही कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटलं आहे. राजीव गांधींना वाजपेयी सरकारनं क्लीन चिट दिली होती, असा दावादेखील खेरा यांनी पत्रकार परिषदेत केला.
'तुम्हाला (मोदी सरकारला) बोफोर्सवर चर्चा करायची असेल, तर आम्ही त्यासाठी तयार आहोत. आम्ही तुमच्यासारके भित्रे नाहीत,' असं म्हणत खेरा यांनी राफेलचा संदर्भ दिला. '2003 मध्ये अटलबिहारी वाजपेयींचं सरकार होतं. त्यावेळी मुकुल रोहतगी अतिरिक्त महाधिवक्ते होते. राजीव गांधींविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचं त्यावेळी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं होतं. त्यानंतर वाजपेयींनी राजीव गांधींविरोधात सर्वोच्च न्यायालयात न जाण्याच्या सूचना दिल्या होत्या,' असं खेरा यांनी सांगितलं.
स्वत:च्या अपयशाचं खापर दुसऱ्यांवर फोडणारे मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान असल्याची टीका त्यांनी केली. 'मोदी आजही त्यांच्या अपयशाला जवाहरलाल नेहरु, राजीव गांधी आणि काँग्रेस सरकारांना जबाबदार धरतात. मोदी पाच वर्षात अपयशी ठरले. त्यामुळेच आता राजीव गांधींचं नाव घेऊन ते मूळ मुद्द्यांपासून पळ काढत आहेत,' अशी शब्दांत खेरा यांनी मोदींचा समाचार घेतला. माहिती अधिकाराच्या अंतर्गत वारंवार अर्ज करुनही मोदींच्या परदेश दौऱ्यांची, त्यावेळी त्यांच्यासोबत विमानात उपस्थित असलेल्यांची माहिती का दिली जात नाही, असे प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केले.