मुंबई- काँग्रेसमध्ये नुकतीच सहभागी झालेली आणि उत्तर मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात असलेली अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत ऊर्मिला मातोंडकरनं धर्माबद्दल मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली, माझे पती मुसलमान असले तरी मी हिंदूच आहे आणि त्याचा आम्हा दोघांनाही गर्व आहे. आपल्या देशात एक प्रकारची विविधता आहे. ज्याला जसं राहायचं आहे, तसं तो राहू शकतो.मला ट्रोल करणारे हे इस्लामला एका विशेष रंगात रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी कधीही धर्मांतर केलेलं नाही. माझ्या पतीला जेवढा मुसलमान असल्यावर गर्व आहे, मलाही तेवढाच हिंदू असल्याचा गर्व आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ऊर्मिलानं मुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे तिला ट्रोल केलं जातं होतं. त्या ट्रोलर्सना तिनं या मुलाखतीच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मला जातीवरून ट्रोल करणारे लोक द्वेष आणि बदल्याचं राजकारण करतात. तसेच यावेळी त्यांनी भाजपाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कोणतीही व्यक्ती गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासावर बोलत नाही. ट्रोलर्सनी दाखवून दिलं आहे की ते कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात. त्या सगळ्यांनच वाटत की राजकारणात एक ग्लॅमर डॉल आली आहे. मी बोलण्यापेक्षा माझ्या कामातून उत्तर देईन, असंही ऊर्मिला म्हणाली आहे.
उत्तर मुंबईतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही ऊर्मिलानं मुंबईकर असल्यावर स्पष्टीकरण दिलं होतं. ‘मी मुंबईकर आहे’ आणि याआधीही होती आणि यापुढेही राहणार आहे, याबाबत मला कोणालाही प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. मी स्टार म्हणून ही निवडणूक लढवीत नाही. आपल्या लोकशाहीमध्ये संपूर्ण जनता हीच खरी स्टार आहे. मी काँग्रेसची विचारधारा घेऊन ही निवडणूक लढणार आहे. एक चांगला विचार घेऊन मी ह्या क्षेत्रात उतरलेली आहे, असंही ऊर्मिला मातोंडकर म्हणाली आहे.मुंबईमध्ये उत्तर मुंबई हा एक खूप चांगला आणि सुंदर विभाग बनवून दाखवायचा आहे. मला कोणावरही आरोप करायचे नाही आहे. मला ही निवडणूक प्रेमाने आणि मोठ्या मनाने लढवायची आहे, द्वेषाचे राजकारण मला करायचे नाही. निवडणुकीनंतरही मी काँग्रेस पक्षासोबत असणार आहे, असे उद्गार उत्तर मुंबईतील काँग्रेसची उमेदवार आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी आज बोरिवलीमध्ये काढले.