नवी दिल्ली, लोकसभ निवडणूक 2019 : क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर राजकारणाच्या खेळपट्टीवर आतषबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय जनता पक्षानं त्याला पूर्व दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. दिल्लीत निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या अन्य उमेदवारांना गंभीरने आधीच चीतपट केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत विविध पक्षांचे मिळून 349 उमेदवार उभे आहेत आणि त्यात सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून गंभीरने मान पटकावला आहे. उमेदवारी अर्ज भरताना गंभीरने आपली संपत्ती जाहीर केली आणि त्यात तो 147 कोटींच्या संपत्तीचा मालक असल्याचे समोर आले आहे. 2017-18च्या प्राप्ती कर परतावात गंभीरने त्याचे उत्पन्न 12.40 कोटी असल्याचे जाहीर केले आहे, तर त्याची पत्नी नताशाच्या प्राप्ती कर परतावात 6.15 लाखाचे उत्पन्न दाखवले आहे. पश्चिम दिल्ली मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर उभे असलेले महाबल मिश्रा हे दुसरे श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांनी 45 कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत 12 कोटींची वाढ झाली आहे. दक्षिण दिल्लीतून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुक लढवणारा ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंगकडे 12.14 कोटींची संपत्ती आहे. विजेंदरने 2008च्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. मंगळवारी 164 उमेदवारांनी अर्ज भरला. त्यात काँग्रेसच्या सात, तर भाजपाच्या तीन उमेदवारांचा समावेश आहे.