गरिबी, बेरोजगारी आऊट, चौकीदार इन; पाच वर्षात 'अशी' बदलली मोदींची भाषा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 12:04 PM2019-04-30T12:04:25+5:302019-04-30T12:06:37+5:30
पाच वर्षांत मोदींच्या भाषणांमधले मुद्दे पूर्णपणे बदलले
नवी दिल्ली: पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, घोटाळ्यांवरुन काँग्रेसला लक्ष्य केलं. त्यावेळी मोदींना सोशल मीडियाची उत्तम साथ लाभली. मात्र पाच वर्षानंतर मोदींच्या भाषणातले मुद्दे पूर्णपणे बदलल्याचं दिसतं. 2014 मध्ये मोदींनी त्यांच्या भाषणांमध्ये गरीब हा शब्द सर्वाधिक वेळा वापरला होता. मात्र यंदा त्यांनी चौकीदार हा शब्द सर्वाधिक वेळा वापरला आहे.
इंडिया टुडे या संकेतस्थळानं मोदींच्या पाच वर्षातील बदललेल्या भाषणांवर एक वृत्त प्रकाशित केलं आहे. यासाठी 2014 आणि 2019 मधील मोदींच्या प्रत्येकी 5 सभांमधील भाषणांचे मुद्दे विचारात घेण्यात आले. 2014 मधील मोदींच्या पाटणा, वाराणसी, दिल्ली, चेन्नई, मेरठ इथल्या सभांचा आणि 2019 मधील मोदींच्या भागलपूर, केंद्रपाडा, मुरादाबाद, पणजी आणि बुनियादपूरमधल्या सभांची तुलना करण्यात आली आहे.
2014 मध्ये मोदींनी गरीब शब्दावर सर्वाधिक जोर दिला होता. तेव्हाच्या त्यांच्या भाषणात 55 वेळा गरीब शब्द आला होता. मात्र यंदा त्यांनी हा शब्द 44 वेळा वापरला. तरीही मोदींच्या भाषणांचा विचार केल्यास गरीब हा शब्द त्यांनी सर्वाधिक वापरलेल्या शब्दांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोदींनी यंदा चौकीदार शब्दाचा सर्वाधिक वेळा वापर केला आहे. या शब्द त्यांनी तब्बल 106 वेळा वापरला आहे.
चौकीदार, गरीब यांच्या व्यतिरिक्त 2019 मधील भाषणात मोदी (42), काँग्रेस (38), विकास (31), किसान (23), बीजेपी (21) या शब्दांचा मोदींनी सर्वाधिक वापर केला. तर 2014 मध्ये मोदींनी काँग्रेस (43), बीजेपी (31), गुजरात (28), किसान (28), विकास (25) या शब्दांवर विशेष जोर दिला होता. गरिबी, बेरोजगारी या मुद्द्यांना भाजपानं संकल्पपत्रात फारसं स्थान दिलेलं नाही. त्यामुळेच मोदींनीदेखील त्यांच्या भाषणात या मुद्द्यांवर भाष्य केलं नाही. 2014 मधल्या भाषणांमध्ये मोदींनी गरिबी शब्दाचा 19 वेळा वापर केला होता. मात्र यंदा मोदींनी केवळ तीनवेळा त्यांच्या भाषणात गरिबी शब्द उच्चारला आहे. 2014 मध्ये मोदींनी सहावेळा बेरोजगारी शब्द वापरला. मात्र यंदा त्यांनी हा शब्द वापरलेलाच नाही.