नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेते आणि अभिनेत्रींचा राजकारण प्रवेश करण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समाजवादी पार्टीत असलेली प्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदानं भाजपामध्ये प्रवेश केला. जया प्रदा यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना रामपूरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. जया प्रदा यांनी रामपूर लोकसभा मतदारसंघातून 2004ला विजय मिळवला होता.या मुस्लिमबहुल भागात भाजपाला वजनदार उमेदवार सापडला असून, जया प्रदा या सपा-बसपा महागठबंधन आणि काँग्रेसलाही जोरदार टक्कर देऊ शकतात. जया प्रदा यांनी आतापर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत. रामपूरमधून दोनदा खासदार राहिलेल्या जया प्रदा यांचं सपाचे दिग्गज नेते आझम खान यांच्याविरोधात लढाई सुरू आहे. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत जया प्रदा या अमर सिंह यांच्याबरोबर राष्ट्रीय लोकदल(आरएलडी)मध्ये सहभागी झाले होते. त्यांना बिजनौरमधून तिकीटही देण्यात आलं होतं. परंतु मोदी लाटेत त्यांचा दारूण पराभव झाला होता. भाजपा हा जय प्रदा यांनी बदललेला चौथा पक्ष आहे. 1994मध्ये तेलुगू देसम पार्टी(टीडीपी)मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. त्याच पक्षात त्या जवळपास दशकभर होत्या.
जया प्रदांचा भाजपामध्ये प्रवेश, रामपूरमधून आझम खानविरोधात निवडणूक लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 5:46 PM