लखनऊः उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीची जोरदार रंगत पाहायला मिळत आहे. सपा-बसपा आणि भाजपानं प्रचारात आघाडी घेतली आहे. मायावतींनीही गौतमबुद्ध नगर लोकसभा मतदारसंघात एक रॅली केली होती. या रॅलीदरम्यान त्यांनी जनतेला संबोधित केलं. त्या म्हणाल्या, उत्तर प्रदेश राज्यानं मला साथ दिली, तर पंतप्रधान बनण्यासह लोकांच्या समस्या सोडवण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. मायावती यांनी महागठबंधनचे उमेदवार सतवीर नागर यांच्यासाठी प्रचार रॅली केली.या रॅलीदरम्यान त्यांनी गुर्जर, दलित आणि मुस्लिम मतदारांना आपलंसं करण्यासाठी अनेक आश्वासनं दिली. यावेळी त्यांनी महागठबंधनकडून स्वतः पंतप्रधानपदासाठी दावेदार असल्याचं स्पष्ट केलं आहे. महागठबंधनला उत्तर प्रदेशमधून चांगलं यश मिळाल्यास मला पंतप्रधान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मी पंतप्रधान झाल्यास जनतेच्या तुमच्या समस्या चुटकीसरशी सोडवीन, असंही आश्वासनही मायावतींनी दिलं आहे. देशातून मोदी आणि योगींना पळवून लावलं पाहिजे. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका, एकत्र येऊन मतदान करा. मी उत्तर प्रदेशची मुलगी आहे. तुमची बहीण आहे.बसपा सोडल्यास कोणत्याही पक्षानं उत्तर प्रदेशचा विकास केलेला नाही. भू माफियांनी शेतकऱ्यांच्या जागा कवडीमोल भावानं घेतल्या आहेत. विरोधकांना अडकवण्यासाठी केंद्र सरकारनं सीबीआय, ईडी आणि आयटीचा चुकीच्या पद्धतीनं वापर केला आहे. मायावतींनी भाजपासह काँग्रेसवरही हल्लाबोल केला आहे. भाजपा आणि काँग्रेस एकसारखेच पक्ष आहेत. 2014मध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण न करणाऱ्या भाजपाला निवडणूक जाहीरनामा काढण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.
...तर मला पंतप्रधान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही- मायावती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 6:58 PM