नवी दिल्ली- काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात कपिल सिब्बल यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. नोटाबंदीदरम्यान विमानाच्या माध्यमातून व्यावसायिक आणि उद्योगपतींचा काळा पैसा पांढरा करण्यात आला. त्यासाठी भाजपाच्या काही नेत्यांनी कमिशनही घेतलं होतं, असा आरोपही सिब्बल यांनी केला आहे. व्हिडीओत सिब्बल म्हणतात, नोटाबंदीनंतर भाजपा नेत्यांनी 15 टक्क्यांपासून 40 टक्क्यांपर्यंत कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलून दिल्या होत्या. सिब्बल यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, भाजपाकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सिब्बल म्हणाले, नोटाबंदीनंतर जुन्या नोटा बदलून देण्यासाठी अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली होती. ज्या टीमचं नेतृत्व भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केलं होतं. या टीममध्ये वेगवेगळ्या विभागातील अधिकारी होते. मंत्री आणि व्यावसायिकांचे पैसे विमानाच्या माध्यमातून हिंडन एअरबेसवर आणण्यात आले. तिकडून ते रिझर्व्ह बँकेत जमा केले गेले. त्या जुन्या नोटा 35 ते 40 टक्क्यांपर्यंत कमिशन घेऊन बदलण्यात आल्या होत्या. ते म्हणाले, नोटाबंदी हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे. आपली यंत्रणा ही विरोधकांच्या हात धुऊन मागे लागली आहे.
'विमानात काळा पैसा भरला, पांढरा करून आणला'; काँग्रेसचा अमित शहांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 6:58 PM