कोलकाता- पश्चिम बंगालमधल्या पूर्वी बर्धमान जिल्ह्यात प्रचार करणाऱ्या भाजपाच्या उमेदवारावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बर्धमान जिल्ह्यातील औसग्राम स्थित मालदीपाडा गावात घडली आहे. बोलपूरमध्ये भाजपा उमेदवार रामप्रसाद दास म्हणाले, मला तृणमूलच्या गुंडांनी शेतात दोन किलोमीटरपर्यंत पळवून पळवून हाणलं. तसेच माझ्या दोन सहकाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. तृणमूलचं समर्थन असलेल्या गुंडांनीही हे कृत्य केल्याचा आरोप केला आहे.एका रिपोर्टनुसार, लाठी आणि रॉडनं काही हल्लेखोरांनी दास यांच्या कार्यक्रमादरम्यान हल्ला केला आहे. त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांची कार आणि मोटारसायकलचीही जाळपोळ केली आहे. औसग्राम बोलपूर संसदीय क्षेत्राच्या अंतर्गत येतो. परंतु तृणमूल काँग्रेसनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. दास पुढे म्हणाले, 20 जणांना आमचा पाठलाग केला.मी माझ्या सुरक्षारक्षकांसह शेतातून दोन किलोमीटरपर्यंत पळालो. माझं वय 53 वर्षं आहे. तृणमूलचं समर्थन असलेल्या गुंडांनीही आमच्यावर हल्ला केला. माझ्या डोक्यावर वीट मारण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांचा निशाणा चुकवला. दास आणि त्यांच्या दोन माणसांना दोन तासांनंतर वाचवण्यात आलं. दास यांनी 9 तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
ममताच्या गुंडांनी 2 किमी पळवून हाणलं, भाजपा उमेदवाराचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 12:46 PM