बेळगाव : बेळगाव हे अखंड कर्नाटकाचा अविभाज्य अंग असून महाराष्ट्रातील नेते कितीही ओरड करत असले तरी चंद्र-सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत बेळगाव कर्नाटकात राहणार, असे ठाम वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत केले आहे.कर्नाटक सरकारतर्फे साजरा केला जाणारा १ नोव्हेंबर राज्योत्सव दिन आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पाळला जाणारा काळा दिन यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काळा दिनासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी बोलत होते. बेळगाव हे कर्नाटकाचे अविभाज्य अंग असल्यामुळेच याठिकाणी सुवर्ण विधानसौध उभारण्यात आली आहे. वर्षातून एकदा याठिकाणी अधिवेशन भरवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नेतेमंडळी बेळगावसंदर्भात जी वक्तव्य करतात ती येथील म. ए. समितीसारख्या संघटना जिवंत राहव्यात म्हणून असतात. महाराष्ट्रातील नेते फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी असे करतात बाकी काही नाही. तरीही राज्योत्सव दिनी म. ए. समितीकडून काही अनुचित प्रकार घडला तर कायद्याच्या चौकटीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सवदी यांनी स्पष्ट केले.
सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकचेच - लक्ष्मण सवदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2020 12:31 AM