मुंबई : भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी पाऊण तास चर्चा केली. ‘आगे आगे देखो होता है क्या’ अशी या भेटीनंतर प्रतिक्रिया देत लाड यांनी आगामी महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याचे संकेत दिले.
‘महापालिकेतील शिवसेनेची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करेल. राज ठाकरेंशी माझा कौटुंबिक स्रेह आहे. आजच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही,’ असे लाड यांनी माध्यमांना सांगितले. मनसेशी भाजप युती करणार का? या प्रश्नात त्यांनी, ‘आगे आगे देखो होता है क्या’ अशी प्रतिक्रिया दिली.
पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीत मनसे सोबत आली, तर शिवसेनेला सत्तेतून घालवणे सोपे असल्याचे भाजप नेतृत्वाला वाटते. त्यादृष्टीने भाजपने राज यांना गोंजारण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. दरम्यान, अशा भेटींनी आणि कोणी काहीही प्रयत्न केले तरी महापालिकेतील शिवसेनेच्या सत्तेला धक्का लावू शकत नाही, अशी प्रतिक्रिया राज-प्रसाद लाड भेटीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.