मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे दोन्ही नेते महाराष्ट्रातील राजकारणात नेहमीच केंद्रबिंदू ठरले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील ऐतिहासिक सत्तांतर पाहायला मिळालं. एकेकाळचे कट्टर विरोधी पक्ष असलेले शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी या तिघांनी हातात हात घालून भाजपाला सत्तेतून दूर फेकले.
या सत्तासंघर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सर्वच नेत्यांनी सर्वांची भंबेरी उडवून टाकली होती. पहाटे ५ वाजता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी सरकार स्थापन करून शपथविधी सोहळा पार पाडला होता. या दोघांचे सरकार ८० तास चालले परंतु आजही या दोन्ही नेत्यांचं वर्चस्व कमी झाले नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात एक योगायोग कायम असेल आणि राहील. तो म्हणजे दोन्ही नेत्यांचा वाढदिवस हा एकाच दिवशी म्हणजे २२ जुलै रोजी असतो. सध्या कोरोना काळ असल्याने दोन्ही नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संदेश देऊन सामाजिक भान जोपासलं आहे.
पुष्पगुच्छ पाठवू नका, गर्दी जमवू नका, कोरोना नियम पाळा
राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, गर्दी जमवू नये, प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावे, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीवरुन किंवा डिजिटल स्वरुपात व्यक्त कराव्यात. सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याच्या लढाईत योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा येत्या गुरुवारी, दि. 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, हितचिंतक, नागरिकांची होणारी गर्दी व त्यामुळे वाढणारा कोरोनाचा धोका टाळण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते व हितचिंतकांनीही गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करता त्यासाठी खर्च होणारा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसारख्या कोविडविरोधी लढ्यासाठी द्यावा. मान्यताप्राप्त यंत्रणांच्या सहकार्याने, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन रक्तदान शिबिरांसारखे लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करावेत असं अजित पवारांनी सांगितले आहे.
जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! सेवाकार्यात अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. पक्षाचे कोणतेही नेते/कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून/ टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत असं आवाहन भाजपाकडून करण्यात आले आहे. होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत. भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले जाते आहे. त्यामुळे ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन फडणवीसांकडून करण्यात आलं आहे.