भोपाळ – मध्य प्रदेशातील काँग्रेस प्रवक्ता नूरी खान यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. रविवारी संध्याकाळी नूरी खान यांनी ट्विटरवरुन याबाबत घोषणा केली. परंतु अवघ्या २ तासांत नूरी खान यांनी राजीनामा परत घेतला आहे. राजीनामा देताना नूरी खान यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप करत पक्षात धर्मावरुन भेदभाव करत असल्याची नाराजी व्यक्त केली.
नूरी खान यांनी मी मुस्लीम असल्या कारणाने पक्षात डावलण्यात येत असल्याचं म्हटलं. त्यांनी ट्विटमध्ये सांगितले की, काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा मी राजीनामा देत आहे. काँग्रेस पक्षात राहून अल्पसंख्याक कार्यकर्ते आणि आपल्या माणसांना राजकीय आणि सामाजिक न्याय देऊ शकत नाही. माझ्यासोबत भेदभाव केला जात आहे. त्यामुळे मी सर्व पदांचा राजीनामा देत आहे असं त्यांनी सांगितले होते.
तसेच मी संघटनेत काम करण्याच्या हेतून पक्षाशी जोडली गेली. परंतु पक्षात काम करुनही मुस्लीम असल्याने मला डावलण्यात आले. त्यासाठी मी राजीनाम्यासारखं पाऊल उचललं आहे. काँग्रेसमध्ये मी जवळपास २२ वर्ष काम करतेय. परंतु जर मला तिकीट हवं तर मुस्लीम बहुल भागात निवडणूक लढव. त्यामुळे काँग्रेसमध्ये धर्मनिरपेक्षता राहिली नाही. भाजपा आणि काँग्रेसमध्ये काय अंतर नाही का? असा प्रश्न मला प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना विचारायचा आहे असंही नूरी खान यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत म्हटलं.
दरम्यान, अवघ्या २ तासांत नूरी खान यांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील वरिष्ठांनी त्यांच्या नाराजीची दखल घेतली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांच्यासमोर मी माझं म्हणणं मांडलं. २२ वर्षात मी पहिल्यांदाच राजीनामा दिला आहे. माझ्या मनात जी खंत होती ती मी बोलून दाखवली आहे. मात्र कमलनाथ यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी राजीनामा परत घेत असल्याचं नूरी खान यांनी स्पष्ट केले.
राजीनाम्यानंतर हायकमांडनं घेतली दखल
नूरी खान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस हायकमांड सक्रीय झाल्या. नूरी खान म्हणाल्या की, प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्याशी माझं बोलणं झालं. माझ्या तक्रारीवर तोडगा काढला जाईल असं आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर नूरी खान यांनी राजीनामा परत घेतला. ९ डिसेंबरला कमलनाथ यांनी मला भोपाळला बोलावलं असून पुढील रणनीतीबाबत निर्णय घेणार आहेत.