नवी दिल्ली - मध्यप्रदेश विधानसभेच्या 28 जागांसाठी 3 नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकांत प्रचारामध्ये ज्योतिरादित्य शिंदे व सचिन पायलट हे दोन युवा नेते समोरासमोर उभे ठाकले आहेत. ज्योतिरादित्य यांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपामध्ये प्रवेश केला, तर नाराज सचिन पायलट यांनी काँग्रेसमध्ये राहणे पसंत केले. मध्य प्रदेशात विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. सध्या प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान एका प्रचारसभेत भाजपाच्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी चक्क काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावरून निशाणा साधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत ज्योतिरादित्य शिंदे यांनी जोरदार भाषण केलं. भाषणाच्या शेवटी त्यांनी लोकांना आवाहन करताना "पंजा समोरील बटण दाबून विजयी..." म्हटलं. पण आपल्याकडून बोलताना चूक झाली हे लक्षात येताच त्यांनी तातडीने ती दुरुस्ती केली.
"3 तारखेला भाजपाच्या कमळ चिन्हासमोरील बटण दाबून भाजपाच्या उमेदवाराला विजयी करा" असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांनी आवाहन करून भाषण आवरलं. पण त्यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काँग्रेसमध्ये असताना ज्योतिरादित्य शिंदे व सचिन पायलट यांची घनिष्ठ मैत्री होती. राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले होते; पण सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर पायलट यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता.
पोटनिवडणुका होत असलेल्या विधानसभा जागांपैकी 16 जागा या ग्वाल्हेर-चंबळ परिसरात आहेत. ग्वाल्हेर हा ज्योतिरादित्य सिंदिया यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे त्या परिसरातील भाजपला मोठा विजय मिळवून देण्याची कामगिरी त्यांना पार पाडावी लागणार आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आपले सरकार टिकवून ठेवण्यासाठी भाजपचे आणखी 8 आमदार निवडून आणणे आवश्यक आहे. काँग्रेसने जर विधानसभेच्या सर्व 28 जागा जिंकल्या, तर त्या पक्षाचे सरकार पुन्हा मध्यप्रदेशमध्ये स्थापन होऊ शकते. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून राजस्थानातील नेते सचिन पायलट यांच्यावर मोठी कामगिरी पक्षाने सोपविली आहे.