पुणे : मी अनेक अग्निदिव्यांमधून गेलेलो आहे आणि काही अजूनही संपलेली नाहीत. राजकारणात येण्यापूर्वी मी सोशल मीडियावर खरे अकाउंट असणाऱ्या व्यक्तीशी बोलायचो. पण आता तिथे ९५ टक्के लोक खोटे आणि ट्रोलर्स आहेत. राजकारणात प्रवेश केल्यावर माझ्याभोवती असणारे सुरक्षेचे कवच अचानक नाहीसे झाले आणि मी काही लोकांचे लक्ष्य झालो. आजही सोशल मीडियावर ९५ टक्के लोक हे ट्रोलर्स आहेत. आजही सोशल मीडियावरून टीका करणारे माफिया मला खुनी म्हणतात असे विधान खासदार शशी थरूर यांनी केले.
पुण्यात आयोजित सातव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये 'व्हाय आय एम ए हिंदू ' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदुत्ववादावर मते मांडली. ते पुढे म्हणाले की, 'मी हिंदू असण्यामागे इतरांचा नाही तर माझा स्वतःचा दृष्टिकोन आहे. या धर्मात व्यक्तीला स्वतःच्या मतानुसार धर्माचे आचरण करता येते हेच वैशिष्टय आहे. अशी संधी कोणताही इतर धर्म देत नाही. उदाहरणार्थ मी रामाला मानतो तर दुसरी व्यक्ती हनुमान चालीसा पठण करते तर आम्ही दोघेही हिंदू ठरतो. मात्र एखादी व्यक्ती ते करत नसेल तरीही ती हिंदूच ठरते. फक्त धार्मिक नव्हे तर एकमेकांचे राजकीय विचारही मान्य करणे हेही लोकशाहीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. सध्याच्या भारतीय राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, सध्या राजकारण हे राज्यकर्त्यांची आवड आणि कृती यात विभागले आहे. याचाच परिणाम म्ह्णून भारतात दोन टोकाचे गट निर्माण झाले असून त्यांच्यात सहिष्णुतेचा अभाव आहे.