मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 08:55 PM2024-10-21T20:55:46+5:302024-10-21T21:01:08+5:30
Maha vikas Aghadi Seat Sharing: महाविकास आघाडीत जागावाटपावरून तिढा निर्माण झालेला असतानाच आज दिल्लीत महाराष्ट्रातील नेत्यांसोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांची बैठक झाली.
Maha Vikas Aghadi Seat Sharing Latest News: विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरून महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये जोरदार खेचाखेची झाली. त्यामुळे बैठकातील कलह चव्हाट्यावर आला. यात काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मध्यस्थी करत चर्चेचा पुन्हा सुरू केली. त्यात आज दिल्लीत काँग्रेस निवडणूक समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर चेन्निथला यांनी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय कधी होईल, याची माहिती दिली. (Maha Vikas Aghadi Latest Updates)
काँग्रेस निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
काँग्रेसच्या बैठकीनंतर रमेश चेन्निथला काय म्हणाले?
"उद्या (२२ ऑक्टोबर) तीन वाजता मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होईल. २५ तारखेपर्यंत सर्व जागांचा अंतिम निर्णय घेतला जाईल आणि २५ तारखेला जागावाटपाची घोषणा केली जाईल", अशी महत्त्वाची माहिती रमेश चेन्निथला यांनी दिली.
बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल रमेश चेन्निथला म्हणाले, "आज झालेल्या निवडणूक समितीच्या बैठकीत ६३ जागांबद्दल चर्चा केली. अंतिम यादी तुम्हाला (माध्यमांना) दिली जाईल. उद्या (२२ ऑक्टोबर) मुंबईत आमच्या मित्रपक्षांसोबत चर्चा करून अंतिम यादी जाहीर केली जाईल", असे चेन्निथला यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितले.
#WATCH दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा चुनाव को लेकर कांग्रेस CEC की बैठक संपन्न होने के बाद कांग्रेस के चुनाव प्रभारी रमेश चेन्निथला ने कहा, "कल मुंबई में तीन बजे महा विकास अघाड़ी की एक बैठक होगी, जहां हम हमारे सभी गठबंधन दलों से सीट बंटवारे पर बात करेंगे। इसके बाद 25 अक्टूबर को एक… pic.twitter.com/PtWeaz2JMT
— ANI_HindiNews (@AHindinews) October 21, 2024
महाविकास आघाडीत ७-८ जागांवरून तिढा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षात काही जागांवरून तिढा आहे. अनेक मतदारसंघांवर तिन्हीपैकी दोन पक्षांनी दावे केले. त्यातील अनेक मतदारसंघातील तिढा सुटला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ७-८ जागांवरच तिढा आहे.
या जागांसंदर्भात मंगळवारी (२२ ऑक्टोबर) महाविकास आघाडीच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याचा अंदाज आहे. २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत असून, त्यामुळे तिन्ही पक्ष अंतिम निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.