Uddhav Thackeray : शिवसेनेचे (युबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून चंद्रहार पाटील यांनी बैलगाडा शर्यतीच्या मैदानात महायज्ञ आयोजित केला आहे. १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते हा महायज्ञ होणार असून, त्यानंतर बैलगाडा शर्यतही होणार आहे.
अंबाबाई देवी यात्रा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृति दिनानिमित्त चंद्रहार पाटलांनी कवढे महांकाळमध्ये रविवारी (२९ सप्टेंबर) बैलगाडा शर्यत आणि महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे.
चंद्रहार पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य उपसंघटक आहेत. त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, काँग्रेसचे विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर आता चंद्रहार पाटील विधानसभेची तयारी करत असल्याचीही चर्चा आहे.
उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री -चंद्रहार पाटील
या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना चंद्रहार पाटील म्हणाले, "29 सप्टेंबरला बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चार लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या स्पर्धेला आम्ही मुख्यमंत्री केसरी असे नाव दिले आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत."
"जिथे आम्ही बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणार आहोत, तिथे आम्ही महायज्ञ करणार आहोत. उद्धव ठाकरे हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत. आगामी काळात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी आम्ही महायज्ञाचे आयोजन केले आहे", अशी माहिती चंद्रहार पाटलांनी दिली.
बैलगाडा शर्यत जिंकणाऱ्याला थार गाडी
कवठे महांकाळ तालुक्यातील देशिंग गावातील माळावरती बैलगाडा आणि घोडागाडी शर्यत पार पडणार आहे. स्पर्धा जिंकणाऱ्याला थार गाडी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.