पाटणा - बिहारनिवडणूक निकालानंतर तेजस्वी यादव यांची महाआघाडीच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर तेजस्वी यादव यांनी बिहारमधील जनतेचे आभार मानले आहे. तसेच बिहारची जनता आमच्या सोबत असल्याचं म्हटलं आहे. आम्ही हरलो नसून आम्हाला हरवलं गेलं आहे असं देखील तेजस्वी यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी पोस्टल बॅलेट पुन्हा एकदा मोजण्यात यावीत अशी मागणी केली आहे.
"जनादेश महाआघाडीसोबत होता, मात्र निवडणूक आयोगाचा निकाल एनडीच्या पक्षात होता. हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. 2015 मध्ये महाआघाडी स्थापन झाल्यानंतर मते आमच्या बाजूने होती, मात्र भाजपाने सत्ता हस्तगत करण्यासाठी मागच्या दाराने प्रवेश केला" असं देखील तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. उमेदवाराच्या मनातील संशय दूर करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. तेव्हा पुन्हा मतं मोजणं अत्यंत आवश्यक असल्याचं देखील ते म्हणाले. या बरोबरच आम्हाला रेकॉर्डिंग दाखवणेही आवश्यक आहे.
"जनतेच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो"
"2015 मध्ये देखील नितीश कुमार यांनी जनादेशाचा अपमान केला होता. नितीश कुमार यांना खुर्ची जास्त प्रिय आहे. हे लोक कट कारस्थान करून खुर्ची मिळवतात. जनतेने आमचा रोजगाराचा मुद्दा स्वीकारला. जनतेच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. आम्ही हरलेलो नसून जिंकलेलो आहोत आणि आता आम्ही धन्यवाद यात्रा काढणार आहोत. मी बिहारच्या लोकांना धन्यवाद देतो" असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.
"एकूण 10 जागांवर गडबड झाली असून येथे पुन्हा मतमोजणी घेण्यात यावी"
एनडीएला एक कोटी 57 लाख मते मिळाली. म्हणजेच 37.3 टक्के मते एनडीला मिळाली आहेत. मात्र महाआघाडीला एक कोटी 56 लाख 88 हजार 458 मते मिळाली. महाआघाडीला 37.2 टक्के मते मिळाली. एनडीए आणि महाआघाडीमध्ये केवळ 12 हजार मतांचा फरक आहे. एनडीए सरकारने दर वचन दिल्याप्रमाणे काम केले नाही, तर आंदोलन छेडले जाईल. सरकारने 19 लाख नोकऱ्या दिल्या नाहीत, बिहारच्या लोकांना औषधे, सिंचन, शिक्षण आणि रोजगार दिला नाही तर महाआघाडी मोठे आंदोलन छेडेल असे तेजस्वी म्हणाले. निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोपही तेजस्वी यांनी केला आहे. एकूण 10 जागांवर गडबड झाली असून येथे पुन्हा मतमोजणी घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.