वानखेडे स्टेडियमवरील या शाही सोहळ्यात हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर फडणवीस यांनी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेत त्यांच्यासोबत छायाचित्रही काढले.
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आदी नेतेमंडळीही या सोहळ्याला उपस्थित होती. सोहळ्यापूर्वी या तिन्ही नेत्यांमध्ये गप्पा रंगल्या होत्या.
गुरुवारी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी नरमाईची भूमिका घेत शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील भाजपा सरकारच्या भव्य दिव्य शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. शपथविधीनंतर मोदींनी फडणवीस व अन्य नेत्यांना शुभेच्छा दिल्या.
पुणे कँटोनमेंट मतदारसंघात रमेश बागवेंना पराभूत करणारे दिलीप कांबळे यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. तर मुंबईच्या माजी महापौर व गोरेगावमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाईंचा पराभव करणा-या विद्या ठाकूर यांची राज्यमंत्रीपदावर वर्णी लागली आहे.
घाटकोपर पूर्वमधून निवडून येणारे प्रकाश मेहता हे भाजपाच्या मुंबई विभागाचे माजी अध्यक्ष आहेत. युती सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपद भूषवले होते.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड मतदारसंघातून निवडून येणारे विष्णू सावरा हे युती सरकारमध्ये राज्यमंत्री होते. यंदाच्या मंत्रिमंडळात सावरा यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.
मराठवाड्यातील परळी मतदारसंघातून दुस-यांदा निवडून आलेल्या पंकजा मुंडे यांची कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागली आहे.
पुण्यातून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आलेले चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातून येतात. संघात सक्रीय असलेले पाटील हे संघ आणि भाजपामध्ये समन्वयक म्हणून ओळखले जातात.
मुंबईतील बोरीवली मतदारसंघातून निवडून आलेले विनोद तावडे यांचा जन्म १९६३ साली झाला. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. तावडे हे मुळचे कोकणातील सिंधुदुर्ग येथील रहिवासी आहेत. तावडे यांनाही फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे.
सुधीर मुनगंटीवार यांचा जन्म १९६२ साली झाला असून ते भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष होते. नितीन गडकरी यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे मुनगंटीवार हे विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमधून निवडून येतात. मुनंगटीवार तब्बल चार वेळा आमदार झाले आहेत. मुनगंटीवार यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
१९५२ मध्ये जन्मलेले एकनाथ खडसे हे भाजपाचे वरिष्ठ नेते असून गेल्या विधानसभेत ते विरोधी पक्षनेते होते. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून मुक्ताईनगर मतदारसंघातून निवडून येणारे खडसे हे युती सरकारच्या काळात अर्थमंत्री होते. यंदाच्या मंत्रिमंडळात खडसे यांना नंबर दोनचे स्थान मिळाले आहे.
वानखेडे स्टेडियममध्ये रंगलेल्या शाही सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळ आणि या सोहळ्याची खास क्षणचित्रे..(सर्व छायाचित्र - दत्ता खेडेकर)