NCP: अजित पवारांकडून आदेशाचे उल्लंघन, शरद पवार गटाने दिले पुरावे; सुप्रीम कोर्टाने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 04:11 PM2024-10-24T16:11:38+5:302024-10-24T16:13:35+5:30

NCP Sharad Pawar vs Ajit Pawar in Supreme Court: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याचे सांगत शरद पवार गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात घड्याळ चिन्ह गोठवून नवीन चिन्ह देण्याची मागणी केली. सुनावणी दरम्यान काय घडलं?

Maharashtra Assembly Election 2024 Supreme Court gave warning to Ajit Pawar in clock symbol case | NCP: अजित पवारांकडून आदेशाचे उल्लंघन, शरद पवार गटाने दिले पुरावे; सुप्रीम कोर्टाने दिला इशारा

NCP: अजित पवारांकडून आदेशाचे उल्लंघन, शरद पवार गटाने दिले पुरावे; सुप्रीम कोर्टाने दिला इशारा

Supreme Court Clock symbol Hearing Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडून घड्याळ निवडणूक चिन्हाचा वापर करताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे सांगत शरद पवारांच्या वकिलांनी पुरावे कोर्टात सादर केले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरील घड्याळ चिन्हाचे बॅनर, उमेदवारी यादी प्रकाशित करण्यात आलेले लेटर हेड शरद पवारांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात दाखवत तातडीने यावर निर्णय देण्याची मागणी केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला शपथपत्र सादर करण्याचे आदेश देत इशाराही दिला.  या प्रकरणाची सुनावणी ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या गटाकडे देताना काही अटी घातलेल्या आहेत. या अटी पाळल्या जात नाहीत, असे सांगत शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. अजित पवार गटाकडून अटी पाळल्या जात नाही आणि त्यामुळे घड्याळ चिन्ह गोठवून त्यांना आमच्याप्रमाणेच (तुतारी) नवीन चिन्ह या विधानसभा निवडणुकीसाठी द्या, अशी मागणी शरद पवार गटाने केलेली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्या कांत, दीपांकर दत्ता आणि उज्ज्वल भुयाण यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. 

आदेशाचे उल्लंघन; शरद पवार गटाने दाखवले पुरावे

न्यायालयात सुनावणी दरम्यान, शरद पवार गटाने अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हाचा वापर करताना आदेश पाळला जात नसल्याकडे कोर्टाचे लक्ष वेधले. 

घड्याळ चिन्ह वापरताना हे चिन्हाचं प्रकरण न्याय प्रविष्ट असून सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल, असे स्पष्ट लिहिण्याचे कोर्टाने सांगितले आहे. पण, त्याचे पालन केले जात नसल्याचे शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात सांगितले. 

अभिषेक मनु सिंघवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची घोषणा केलेले लेटर हेड दाखवले. चिन्ह वापरण्यात आलेय, पण त्याखाली सूचना लिहिलेली नाही, असे कोर्टाला सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील कार्यालयाबाहेरील बोर्डावरील घड्याळ चिन्हाखाली तशी सूचना लिहिली गेली नसल्याचा फोटो न्यायालयाला दाखवला. अजित पवार गटाकडून मात्र न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात असल्याचा दावा केला. 

सर्वोच्च न्यायालयाने दिली तंबी

सुनावणी अंती न्यायमूर्ती सूर्या कांत यांनी आतापर्यंत पालन केले गेले आणि विधानसभा निवडणुकीतही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल यासंदर्भात शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश अजित पवार गटाला दिले. त्यावर अजित पवार गटाच्या वकिलांनी आम्हालाच शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश का, असं म्हटलं. न्यायालयाने म्हटले की, त्यांनी (शरद पवार गट) तुम्ही उल्लंघन करत असल्याची याचिका केली आहे. तुम्ही केलेली नाही, अशा शब्दात सुनावले. 

न्यायालय म्हणाले की, आम्ही एकदा निर्देश दिलेले आहेत. त्याचे पालन केले गेलेच पाहिजे. तुम्ही (अजित पवार गट) नव्याने शपथपत्र दाखल करा की तुम्ही आदेशाचे उल्लंघन केलेले नाही. दोन्ही गटांनी आमच्या आदेशाचे पालन करावे अशी आम्हाला अपेक्षा आहे. स्वतःसाठी अपमानस्पद परिस्थिती तयार करू नका. जर आम्हाला दिसलं की, आदेशाचे उल्लंघन केले जात आहे, तर आम्ही स्वतःहून स्यू मोटू अवमानना करू शकतो", असा इशारा सुप्रीम कोर्टाने दिला. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Supreme Court gave warning to Ajit Pawar in clock symbol case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.