सदानंद नाईक,उल्हासनगर Maharashtra Assembly election 2024: उल्हासनगर शहर पूर्वेतील धनंजय बोडारे व राजेश वानखडे यांना अनुक्रमे कल्याण पूर्व व अंबरनाथ मतदारसंघातून उद्धवसेनेकडून उमेदवारी जाहीर होताच नागरिकांनी जल्लोष केला. तर दुसरीकडे उल्हासनगर मतदारसंघात आयलानी व कलानी यांची उमेदवारी घोषित होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली.
उल्हासनगर शहर उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ मतदारसंघात विभागले आहे. शहर पूर्वचा बहुतांश भाग अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात येतो. तर उर्वरित भाग कल्याण पूर्व मतदारसंघात येतो.
उद्धवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांना कल्याण पूर्वमधून उमेदवारी घोषित झाली. बोडारे यांची उध्दवसेनेकडून उमेदवारी घोषित होताच कॅम्प नं-४ येथील संतोषनगर शिवसेना शाखेसह इतर शाखेत फटाक्यांची आतिषबाजी होऊन नागरिकांनी जल्लोष केला.
बोडारे, वानखेडेंनी दिली होती कडवी झुंज
बोडारे यांनी गेल्या निवडणुकीत गणपत गायकवाड यांना कडवी झुंज दिली होती. तसंच राजेश वानखडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर, कॅम्प नं-४, कुर्ला कॅम्प येथील वानखडे यांच्या कार्यालय परिसरात जल्लोष व फटाक्यांची आतिषबाजी झाली. वानखडे यांनी बालाजी किणीकर यांना कडवी झुंज दिली होती. फक्त २ हजार मतांनी वानखडे यांचा पराभव झाला होता.
उद्धवसेनेचे धनंजय बोडारे व राजेश वानखडे यांच्या उमेदवाराने शहर पूर्वेत उत्साह होत असतांना दुसरीकडे उल्हासनगर मधून महाविकास आघाडीचे ओमी कलानी व महायुतीचे आमदार कुमार आयलानी यांची उमेदवारी घोषित होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला.
ओमी कलानी यांचा महाविकास आघाडीतील काँग्रेस व उद्धवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यापूर्वीच प्रचार सुरू केला. तर कुमार आयलानी यांच्या स्वपक्षीय सहकाऱ्यांनी व मित्र पक्षातील शिंदेंसेना व अजित पवार गटाने उमेदवारी मागितली होती. मात्र येत्या दोन दिवसांपासून तेही थंड असल्याचे चित्र आहे. एकूणच भाजप व मित्र पक्षातील बंडोबा हे थंडोबा झाल्याचे बोलले जात आहे.
ओमी कलानी हे आई ज्योती कलानीच्या पराभवाचा वचपा काढणार?
कुमार आयलानी यांनी सन-२००९ मध्ये पप्पु कलानी यांचा पराभव केला. तर सन-२०१४ साली ज्योती कलानी यांनी कुमार आयलानी यांचा दणदणीत पराभव करून पतीच्या पराभवाचा वचपा काढला. मात्र सन-२०१९ साली ज्योती कलानी ह्या आयलानीकडून पराभूत झाल्या. सन-२०२४ साली कुमार आयलानी व ओमी कलानी यांची लढत होणार असून सर्वांचे या लढतीकडे लक्ष लागले आहे.