सातारा – मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा संघटना वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करत आहेत. अशातच EWS च्या मुद्द्यावरुन मराठा समाजात मतभेद असल्याचं समोर आलं आहे. EWS चा मराठा समाजाला फायदा करुन घेतला पाहिजे असा ठराव गोलमेज परिषदेत पास करुन घेतला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणावरील स्थगिती कोर्टाकडून उठत नाही, तोपर्यंत फायदा मिळाला पाहिजे अशी मागणी मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी केली.
याबाबत सुरेश पाटील म्हणाले की, छत्रपती संभाजीराजेंनी काही संघटनांचे ऐकून EWS आम्हाला नको अशी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडली, ती भूमिका चुकीची आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शिक्षणात कोणत्याही समाजाला आरक्षण देता येणार नाही असा निर्णय आहे. आज मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती असल्याने समाज आरक्षणापासून वंचित आहे. मराठा समाजासमोरील ताट काढून घेतलं आहे त्यामुळे समाजात असंतोष पसरला आहे. येत्या १० ऑक्टोबर रोजी मराठा गोलमेज परिषदेने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच १० तारखेला महाराष्ट्र कडकडीत बंद राहणार आहे यासाठी राज्यभरात दौरा सुरु आहे. EWS आरक्षण तात्काळ लागू करा, नोकरभरती बंद करा आणि समाजातील तरुणांवर दाखल झालेले बोगस गुन्हे रद्द करा. या तीन गोष्टी सरकारने मान्य केल्या तर कदाचित १० तारखेच्या बंदवर विचार करू अन्यथा १० तारखेला राज्यभरात बंद पाळला जाईल, हा कडकडीत बंद होण्यासाठी समाजात जाणार असल्याचं सुरेश पाटील यांनी सांगितले.
दोन्ही राजेंनी मराठा समाजाचं नेतृत्व करू नये
संभाजी महाराज हे राजे आहेत, ते शाहू महाराजांचे वंशज आहे. मुख्यमंत्र्या त्यांनी सगळ्या संघटना एकत्र बोलावून त्यांची मते जाणून घ्यायला हवी होती, परंतु काही संघटनांचे ऐकून गैरसमज झाल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ते मत मांडले आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती उदयनराजे यांनी मराठा समाजाचे नेतृत्व करू नये असं सामान्य मराठा म्हणून मला वाटतं, मराठा आरक्षणात भाग घेतात तिथपर्यंत ठीक आहे, जर मराठा समाजाचं नेतृत्व एखाद्या राजाकडे गेले, तर धनगर समाज, ओबीसी, भटकेविमुक्त, इतर समाज आले तर त्यांचेही नेतृत्व त्यांना करावं लागेल, प्रत्येक संघटना आपपल्या समाजाचे प्रश्न मांडत असतात, राजांनी कोणत्याही एका समाजाचे नेतृत्व न करता सर्व समाजाचे नेतृत्व राजे म्हणून ते करतायेत, त्यामुळे त्यांची भूमिका योग्य आहे, आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका आम्ही पार पाडत आहोत असंही सुरेश पाटील यांनी सांगितले.
मराठा संघटना आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय झालं?
मराठा आरक्षणाचा प्रश्नावर खासदार संभाजीराजे, नरेंद्र पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाला तात्पुरत्या स्वरूपात ईडब्लूएसच्या सवलती आणि आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ईडब्लूएसचे आरक्षण एका विशिष्ट समाजाला देता येत नाहीत. असे आरक्षण दिल्यास पुन्हा त्यावर न्यायालयात याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. शिवाय, ईडब्लूएसच्या जाचक अटी मराठा समाजाला मान्य नाहीत. मागासवर्ग आयोगाने समाजिक मागासलेपणा सिद्ध केल्याने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातूनच आरक्षण मिळणे न्यायसंगत असल्याचे संभाजीराजे यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. दहा टक्के ईडब्लूएसच्या समावेशामुळे मराठा समाजाच्या मुळ आरक्षणाचा लढा न्यायालयात कमकुवत होण्याची शक्यता मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर मांडली. त्यांनी याचिका दखल घेऊन हा निर्णय मागे घेण्याबाबत सुधारित आदेश जारी करण्याचे आश्वासन दिल्याचे संभाजीराजे म्हणाले.