मुंबई: सर्वसामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळावी, या मागणीसाठी भाजपाकडून मुंबईतील चर्चगेट, कांदिवली, बोरिवली, घाटकोपर, ठाण्यात आंदोलन केलं. याशिवाय, अनेक ठिकाणी आंदोलन करण्यापासून भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं. दरम्यान, भाजपा कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रेलभरो आंदोलन केलं. बस आणि विमानातून प्रवास करण्याची मुभा देण्यात येते. मग रेल्वेतून प्रवास का करू दिला जात नाही?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.
आज विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात लोकल प्रवासासाठी मुंबईतील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. दरेकरांसोबत यावेळी आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार राहुल नार्वेकर उपस्थित होते. आंदोलनावेळी पोलिसांनी आमदार नार्वेकर यांना ताब्यात घेतलं. तर, तिकडे कांदिवलीत आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी प्लॅटफॉर्मवर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली.
दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची परवानगी द्यायावेळी प्रवीण दरेकर म्हणाले, कोर्टाने रेल्वे प्रवासाबाबत विचारणा केलीये. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्य सरकारने प्रस्ताव दिला तर लगेच रेल्वे सुरू करू असं म्हटलंय. तरीही सरकार लोकल का सुरू करत नाही? बस प्रवासाची परवानगी देता, विमान प्रवासाची परवानगी देता तर मग रेल्वे प्रवासाची मुभा का दिली जात नाही. सर्वसामान्यांनी काय घोडं मारलं आहे ?, असा प्रश्न त्यांनी केला. तसेच, दोन डोस घेतलेल्यांना प्रवासची मुभा देण्याची मागणीही दरेकरांनी केली.
दरेकरांना 260 रुपये दंडदरम्यान, प्रवीण दरेकर यांनी आंदोलनावेळी चर्चगेट स्टेशनमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते लोकलमध्ये शिरले आणि त्यांनी लोकलने प्रवास करायला सुरुवात केली, काही वेळातच त्यांनी लोकल प्रवास करण्यापासून अडवण्यात आलं. त्यानंतर पुन्हा दरेकर लोकलमध्ये चढले. चर्चगेट ते चर्नीरोड असा प्रवास त्यांनी केला. विशेष म्हणजे दरेकरांनी विना तिकीट प्रवास केल्याने टीसीने त्यांना 260 रुपयांचा दंड आकारला. दरेकर यांनीही दंड भरला. पोलीस, रेल्वे प्रशासन त्यांचं काम करत आहेत. त्याला आमचा विरोध नाही. पण सरकारच्या धोरणावर आमचा आक्षेप आहे, असं दरेकर यावेळी म्हणाले.