Maharashtra Budget 2021 : "महाराष्ट्र संकटापुढे कधीही झुकला नाही"; सरकारकडून आरोग्य विभागासाठी ७ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 02:16 PM2021-03-08T14:16:24+5:302021-03-08T14:18:13+5:30
Maharashtra Budget 2021 : कोरोनावरील उपचारांसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कोरोना उपचार केंद्र सुरू करणार असल्याची अजित पवारांची माहिती
कोरोनाच्या संकटात आरोग्य सेवांसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. सरकारकडून आरोग्य विभागासाठी ७ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. त्यांनी सोमवारी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. सुरूवातीला अजित पवार यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर अर्थसंकल्पाचं वाचन सुरू केलं. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधीमंडळात येत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादनही केलं.
अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला अजित पवार यांनी सर्व कोविड योद्धांचे आभार मानले. महिलांसाठी विशेष योजना सुरू करण्याचा मानस आहे. महाराष्ट्र कधीही संकटापुढे झुकला नाही. सध्या कोरोनाचं संकट आहे. आपल्या सर्वांसमोर अनेक आव्हानं असल्याचं ते म्हणाले. कोरोनाच्या संकटात आरोग्य सेवांसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. सरकारकडून आरोग्य विभागासाठी ७ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, सातारा येथे वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येतील. तसंच रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधात्मक उपकरणंही लावण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी अजित पवार यांनी दिली.
राज्यातील ११ परिचारिक प्रशिक्षण वर्गांचे महाविद्यालयात रुपांतर करणार येणार असल्याची माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली. लातूरच्या रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण इमारतीसाठी ७३ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. याशिवाय ससून रुग्णालयातील कर्मचारी निवासासाठी २८ कोटी रुपये मंजूर करण्यात करण्यात आल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
शेतकऱ्यांसाठी शून्य व्याजदरानं कर्ज
अर्थसंकल्पादरम्यान अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाची घोषणा केली. तीन लाख रूपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन ते वेळेत परत करेलेल्या शेतकऱ्यांना आता शून्य टक्के व्याजदरानं कर्ज दिलं जाणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. तसंच एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी २ हजार कोटींच्या योजना तसंच कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी महावितरणला १,५०० कोटी रूपयांचा निधी दिला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. याशिवाय विकेल ते पिकेल या योजनेसाठी २१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं.
शेतकऱ्यांनी सावरलं
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या कालावधीत कृषी क्षेत्रानंच राज्याची अर्थव्यवस्था सावरली. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहे. ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना १९ हजार कोटी कर्ज थेट वर्ग करण्यात आले आहेत. तसंत शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करुन देण्यात असून यावेळी ४२ हजार कोटींचे पीक कर्जाचे वाटप केल्याची माहिती पवार यांनी दिली. कोरोनाच्या कालावधीत सेवा क्षेत्रात घट झाली असली तरी कृषी क्षेत्रात मात्र वाढ झाली आहे. या कालावधीत कृषी क्षेत्रात ११ टक्के वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ व्हावी यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.