मुंबई - आज महाविकास आघाडी सरकारतर्फे राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोरोनासारखा कठीण काळ सोसून उभारी घेत असलेला महाराष्ट्र आजच्या अर्थसंकल्पाकडे आशा लावून होता. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात महिला विकास, उद्योग, रस्ते, रेल्वे, दळणवळण इ. सर्वच क्षेत्राच्या विकासासाठी भर देण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली.
पुणे-संगमनेर-नाशिक दरम्यान जलद रेल्वे मार्ग सुरु करण्याची आमची बऱ्याच आधीपासूनची मागणी होती. यानुसार यादरम्यान २३५ किमी अंतराचा जलद रेल्वे मार्ग करण्याची घोषणा केल्याने यादरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा मोठा दिलासा असल्याने या निर्णयाबाबत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. सत्यजित तांबे यांनी मांडले.
कुटुंबातील स्त्रीच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार आहे. हा महिला सबलीकरणासाठी ऐतिहासिक निर्णय ठरणार असून घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई योजना देखील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना याचा उपयोग होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात राजीव गांधी सायन्स पार्क उभारण्याची घोषणा केल्याने युवकांना यातून नक्कीच मदत होईल अशी आशा तांबे यांनी व्यक्त केली.
'कोरोनाच्या संकट काळात राज्याचे नुकसान झाले असताना आणि केंद्राकडून राज्याच्या GST चा वाटा पूर्णतः मिळत नसताना देखील राज्यातील प्रत्येक स्तरातील प्रत्येकाला योग्य न्याय देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री. अजित पवार, महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडी सरकार यांचे अभिनंदन.' अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी अर्थसंकल्पाबाबत समाधान व्यक्त केले.