मुंबई – नेहमी मराठी भाषेसाठी आग्रही राहणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांनी स्वत:च्या महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरू असताना इंग्रजी भाषेच्या वापराला दिवाकर रावतेंनी विरोध केला. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दिवाकर रावतेंनी शिवसेनेलाही कानपिचक्या लगावल्या.( Shivsena Leader Diwakar Rawate Target Mahavikas Aghadi Government over ignorance of Marathi Language)
याबाबत दिवाकर रावते विधान परिषदेत म्हणाले की, मराठी शब्द संग्रह असताना इंग्रजीचा वापर करणे चुकीचं आहे, सभागृहात कामकाज सुरु असताना इंग्रजी भाषेचा वापर होतोय, हा प्रकार हास्यास्पद आहे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाही अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एकही शब्द व्यक्त करण्यात आला नाही अशी खंत रावतेंनी व्यक्त केली.
त्याचसोबत प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर राजभाषा असल्याने बंधनकारक आहे, परंतु आजही तसं होताना दिसत नाही, मुंबईतील बॉम्बे क्लबचे नाव आजही तेच आहे बदललं जात नाही, मुंबईत सर्व भाषा आणि परप्रांतीयांचे भवन बांधले जातात मराठी भवन का नाही? शिवसेनेला मराठीबाबत एक शब्द उच्चरता आला नाही हे दुर्दैव अशा शब्दात दिवाकर रावतेंनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. टीव्ही ९ ने याबाबत वृत्त दिलं आहे.
दरम्यान, औरंगाबादचं संभाजीनगर मुद्द्यावरूनही दिवाकर रावतेंनी महाविकास आघाडी सरकारला फटकारलं, संभाजीनगर बोलायचं नाही कारण हे किमान समान कार्यक्रमात नाही, मराठीबाबत अर्थसंकल्पात तरतूद नाही हे मला बोलावं लागतंय, मुख्यमंत्री शिवसेनेचा, मात्र तरीही मराठीसाठी अर्थसंकल्पात काहीच नाही, मी मेल्यावर साहेबांना भेटलो तर मराठी भाषेसाठी काय केलं तर मी काय उत्तर देऊ? अशी संतप्त भावना दिवाकर रावतेंनी बोलून दाखवली.