मुंबई: मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) यांच्या हत्येवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत अतिशय आक्रमक पवित्रा घेतला. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाची माहिती देताना दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर (MP Mohan Delkar) यांच्या आत्महत्येची एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा केली. यावेळी फडणवीस यांनी हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून अनिल देशमुख आणि नाना पटोले यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं.मोहन डेलकर पाचवेळा दादरा नगर हवेलीचे खासदार राहिले. त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केल्या. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांचं नाव आहे. मी मुंबईत आत्महत्या करत आहे. कारण मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असं डेलकर यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी सभागृहाला दिली."मनसूख हिरेन यांचा खून झाला असावा, तो सचिन वाझेंनी केला असावा", सभागृहात गंभीर आरोपअनिल देशमुख यांनी डेलकर प्रकरणाची माहिती देत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन प्रकरण उपस्थित केलं. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात इतके पुरावे असताना त्यांना का पाठिशी घातलं जातंय? सरकार त्यांचा वाचवण्याचा प्रयत्न का करतंय?, असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले. सचिन वाझे यांचं निलंबन झालं असताना त्यांनी एका पक्षात प्रवेश केला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांचं निलंबन मागे घेण्यात आलं, असं म्हणत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लक्ष्य केलं.भाजप आमदारांच्या घोषणा अन् बारामती कनेक्शन; फडणवीसांना हसू अनावरपोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याशी संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर भाष्य करणं योग्य नाही, असं देशमुख म्हणाले. त्यावर हे प्रकरण न्यायालयात गेलं असलं तरीही ते सुनावणीसाठी आलेलं नाही, असं प्रत्युत्तर देत फडणवीस यांनी देशमुखांचा मुद्दा खोडून काढला. यावर केंद्र, राज्याची सुरक्षा यंत्रणा असताना मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं असलेली कार पोहोचलीच कशी, असा प्रश्न काँग्रेस नेते नाना पटोलेंनी उपस्थित केला.चोख सुरक्षा व्यवस्था असताना अंबानींच्या घराबाहेर पोहोचतेच कशी, या प्रकरणातले सीडीआर बाहेर कसे येतात, असे सवाल पटोलेंनी उपस्थित केले. याची चौकशी व्हायला हवी, असं पटोले म्हणाले. त्यावर मी मिळवले सीडीआर. माझी चौकशी करा. चौकशीच्या धमक्या कुणाला देता? असं म्हणत फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. माझी चौकशी करा. पण त्याआधी खुन्याला अटक करा, असं फडणवीस म्हणाले. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडलं.
Maharashtra Budget Session: धमक्या देता का? माझी चौकशी करा! फडणवीस संतापले; देशमुख, पटोलेंना एकटे भिडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 2:52 PM