मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. लवकरच ठाकरे मंत्रिमंडळात फेरबदल होणार असून यात अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू दिली जाणार असल्याची शक्यता आहे.यात आदिवासी विकास मंत्री के. सी पाडवी आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचा नावाचा समावेश असल्याची माहिती आहे.(Uddhav Thackeray Cabinet Expansion)
काँग्रेसच्या या दोन्ही चेहऱ्यांऐवजी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात येऊ शकतो. के. सी पाडवी यांच्याजागी आदिवासी चेहरा तर अस्लम शेख यांच्या जागी मुस्लीम चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. १०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणाचा आरोप असल्याने राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नाव आल्यानं संजय राठोड यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या दोघांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीकडील प्रत्येकी एक मंत्रिपद रिक्त आहे.
मंत्रिमंडळ फेरबदलात काँग्रेसच्या दोन चेहऱ्यांना वगळण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्लीत लॉबिंग सुरू आहे. अलीकडेच नितीन राऊत यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरातही दिल्लीत भेटीगाठी घेणार आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. पक्ष संघटनेच्या दृष्टीकोनातून तिन्ही पक्ष मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये सतेज पाटील यांना बढती मिळणार असल्याचंही बोललं जात आहे. सतेज पाटील यांच्याकडे सध्या शहर गृहराज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे.
अलीकडेच काँग्रेसच्या नेत्यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांच्या कामकाजाची माहिती घेतली आहे. याची समिक्षा करून दोन काम न करणाऱ्या किंवा प्रदर्शन खराब असलेल्या मंत्र्यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. काँग्रेसने त्यांच्या वाट्याला आलेल्या खात्यांपैकी दोन मंत्र्यांकडील खाती काढून घेण्याचा प्रस्तावही तयार केला आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदासह मंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
सध्या कोणत्या पक्षाकडे किती मंत्रिपदं?
मुख्यमंत्रिपदावरून बिनसल्यानंतर भाजपा आणि शिवसेना वेगळी झाली. शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीची हातमिळवणी करत महाविकास आघाडीची स्थापना केली. २०१९ मध्ये सत्तांतर करताना शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १२ मंत्रिपदं त्यात ८ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदं देण्यात आली. काँग्रेसला १० पैकी ८ कॅबिनेट तर २ राज्यमंत्रिपदं आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह १४ मंत्रिपदं त्यात १० कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदाचा समावेश आहे.