Maharashtra Cabinet Reshuffle: केंद्रानंतर राज्यातही मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे; काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना वगळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 12:16 PM2021-07-14T12:16:53+5:302021-07-14T12:22:28+5:30
CM Uddhav Thackeray cabinet reshuffle: काँग्रेसच्या नेत्यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांच्या कामकाजाची माहिती घेतली आहे. याची समिक्षा करून दोन काम न करणाऱ्या किंवा प्रदर्शन खराब असलेल्या मंत्र्यांना हटविण्यात येणार आहे. काँग्रेसने त्यांच्या वाट्याला आलेल्या दोन मंत्र्यांकडील खाती काढून घेण्याचा प्रस्तावही तयार केला आहे.
केंद्रात मंत्रीमंडळाचा पूर्ण चेहरा मोहरा बदलल्यानंतर (Union Cabinet Expansion) आता राज्यातही मंत्रिमंडळ विस्तारासोबत (Maharashtra Cabinet Expansion) काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे काँग्रेसकडून तसा प्रस्ताव जाण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आणि एच. के. पाटील मुंबईत आले होते. यावेळी हा निर्णय झाल्याचे समजते आहे. (Maharashtra: Congress will replace 2 of its ministers in CM Uddhav Thackreay government.)
काँग्रेसच्या एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले की, काँग्रेसच्या नेत्यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांच्या कामकाजाची माहिती घेतली आहे. याची समिक्षा करून दोन काम न करणाऱ्या किंवा प्रदर्शन खराब असलेल्या मंत्र्यांना हटविण्यात येणार आहे. काँग्रेसने त्यांच्या वाट्याला आलेल्या खात्यांपैकी दोन मंत्र्यांकडील खाती काढून घेण्याचा प्रस्तावही तयार केला आहे.
अकार्यक्षम मंत्र्यांची यादी बनविली
या मंत्र्यांनी सांगितले की, कोरोना काळात काही मंत्री कुठेच दिसले नाहीत. ज्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे त्यांची यादी बनविण्यात आली आहे. आता सारे मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे.
महत्वाचे म्हणजे या दोन मंत्र्यांमध्ये एक मुंबईतील आणि दुसरे विदर्भातील असल्याचे लोकमतला सुत्रांनी सांगितले आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदासह मंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्य़ाची शक्यता आहे. तसेच खर्गे, पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.
विधानसभा अध्यक्षपदाचे नाव निश्चित
एका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात दोन ते तीन मंत्री बदलले जातील. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठीचे नाव निश्चित झाले आहे. त्यासाठी पक्षाचे प्रभारी पाटील, बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, हे तिघे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत. (CM Uddhav Thackeray may soon reshuffle his cabinet)