पुणे : महाविकास आघाडीने सहापैकी जवळपास चार जागांवर विजय निश्चित केला आहे. यापैकी दोन जागांवर विजयासाठी लागणारी मते मिळालेली नाहीत. यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु आहे. असे असताना महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिला आहे.
धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या निकालाचे आश्चर्य वाटले नाही. मात्र, भाजपाचे बालेकिल्ले असलेल्या पुणे आणि नागपुरात महाविकास आघाडीला मिळालेले यश खूप महत्वाचे आहे. महाविकास आघाडीने गेले वर्षभर एकत्र येऊन काम केले, ते लोकांनी स्वीकारले आहे. महाराष्ट्राचे चित्र बदलत आहे. सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा मिळत आहे, असे पवार म्हणाले.
तसेच नागपूर आणि पुण्यातील कल पाहून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मिळून नको, एकेकटे लढा असे आव्हान दिले होते. तसेच शरद पवारांवर छोटा नेता असल्याची टीका केली होती. यावर पवारांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. विनोदी विधाने करणं हा चंद्रकांत पाटलांचा लौकिक आहे, असे खोचक वक्तव्य शरद पवारांनी केले आहे.
मागच्या विधान परिषदेला ते कसे निवडून आले ते त्यांनाही माहिती आहे. म्हणून त्यांनी विधानसभेला उतरत पुण्यातील सुरक्षित मतदार संघ निवडला. चंद्रकांत पाटलांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ बदलला नसता. त्यामुळे ते जे बोलतात त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका पवार यांनी केली.
बंडखोरी झाल्याने पाटील जिंकलेलेपुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून आले होते, पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र तेव्हाच्या निवडणुकीत सांगलीच्या अरूण लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. यानिवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना ६२ हजारांच्या आसपास मतदान झाले होते, तर सारंग पाटील यांना ५९ हजारांच्या वर मतदान झाले, अवघ्या २ हजारांच्या फरकाने भाजपाने ही जागा राखली होती, यात विशेषत: अरूण लाड यांनी घेतलेली २५ हजारांहून अधिक मते लक्षणीय होती, त्यामुळे लाड यांच्या बंडखोरीचा फटका बसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर मतदारसंघात निसटता पराभव सहन करावा लागला होता.
गेल्या ३० वर्षांत पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. २००२ ला जनता दलाचे प्रा. शरद पाटील यांचा अपवाद वगळता २४ वर्षे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच प्रतिनिधित्व केले. मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादीमध्ये निकराची झुंज झाली आणि चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. यात अरूण लाड यांच्या बंडखोरीचा फटका पक्षाला बसला