मुंबई - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे राज्यातही रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून राज्य व केंद्र सरकार आमनेसामने आले आहे. राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर आरोप केल्यानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व मनसुख मांडविया यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर आता काँग्रेसने (Maharashtra Congress) भाजपा (BJP) आणि मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे. "दिल्लीची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे केंद्र सरकारमधील महाराष्ट्रद्रोही मंत्री महाराष्ट्राच्या काय कामाचे?" असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता 'ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत' असं उत्तर देण्यात येतं. रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा करू नका सांगितलं जातं. दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे?" असं आपल्या ट्विटमध्ये म्हणत काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. तसेच "दिल्लीची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे केंद्र सरकारमधील महाराष्ट्रद्रोही मंत्री महाराष्ट्राच्या काय कामाचे?" असं म्हणत एक फोटो ट्विट केला आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री पीयूष गोयल, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आणि संजय धोत्रे या नेत्यांवर महाराष्ट्राची बदनामी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रेमडेसिविर या औषधाची आवश्यकता असताना आणि उपलब्धतादेखील असताना तात्काळ निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे आणि राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांना ताबडतोब रेमडेसिविरच्या कुपी पुरवल्या जाव्यात, अशी मागणी नवाब मलिक केली आहे.
"महाराष्ट्राला भ्रष्ट सरकारने ग्रासले"
महाराष्ट्राला अयोग्य आणि भ्रष्ट सरकारने ग्रासले आहे. केंद्र सरकारने राज्याला सर्वाधिक ऑक्सिजनचा पुरवठा केला, तसेच राज्य सरकारसाेबत दरराेज संपर्कात आहे. मात्र, राज्य सरकारकडून ऑक्सिजनवरून राजकारण सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी, असे गाेयल म्हणाले. सध्या औद्याेगिक वापराचा ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी वळविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
"…हेच जर दुसरं कोणी केलं असतं तर त्यांना हिंदूद्रोही ठरवलं असतं", काँग्रेसने लगावला सणसणीत टोला
कुंभमेळ्यामुळे निर्माण झालेल्या संसर्गाच्या संकटाची गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi ) मोठे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत म्हणाले की, मी संतमंडळींना आवाहन केले आहे की, आता कुंभमेळ्यातील दोन शाही स्नान पूर्ण झाले आहेत. आता कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे कुंभमेळा प्रतीकात्मक रूपातच साजरा करावा. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला बळ मिळेल. पंतप्रधान मोदींनी केलेल्या या आवाहनानंतर काँग्रेसने मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. "…हेच जर दुसरं कोणी केलं असतं तर त्यांना हिंदूद्रोही ठरवलं असतं" असं म्हणत निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "बरं झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा समाप्त करण्याचं आवाहन केलं. हेच जर दुसरं कोणी केलं असतं, तर त्याला हिंदूद्रोही ठरवलं असतं. कालपर्यंत 49 लाख लोकांनी स्नान केलं आहे. कोलकातापर्यंत जाणारी गंगा किती कोरोना घेऊन कुठपर्यंत जाईल, याची माहिती नाही" असं निरुपम यांनी म्हटलं आहे.