अनिल देशमुख यांच्या जागी दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावर राज्याच्या गृहमंत्रिपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेले वळसे पाटील यांच्याकडे आतापर्यंत उत्पादन शुल्क आणि कामगार अशी दोन खाती होती. आता उत्पादन शुल्क खात्याचा अतिरिक्त कार्यभार हा उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कामगार खात्याचा अतिरिक्त कार्यभार हा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, आज दिलीप वळसे पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. "गृहमंत्रिपदाची जबाबदारी मोठी आहे. ती पार पाडायला आवडेल. आजच मी त्या पदाची सूत्रं हाती घेणार आहे. ही सूत्रं हाती घेण्यापूर्वी मी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांचं मार्गदर्शनही घेतलं," असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. त्यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. वळसे-पाटील शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातातवळसे पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती मानले जातात. सुरुवातीच्या काळात पवार यांचे साहाय्यक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचे वडील दत्तात्रय वळसे पाटील हेदेखील आमदार होते. गृहमंत्रिपदासाठी शरद पवार कोणाला संधी देतात, याविषयी दिवसभर जोरदार चर्चा होती. जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव आघाडीवर होते. यापूर्वी त्यांनी गृहमंत्रिपद सांभाळलेदेखील आहे. त्याशिवाय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेही नाव चर्चेत होते. मात्र, पवार यांनी वळसे पाटील यांच्या नावाला पसंती दिली. अजित पवार यांनीही वळसे पाटील यांच्या बाजूने कौल दिला, असे सूत्रांनी सांगितलं.
वळसे पाटील यांचा प्रवासदिलीप वळसे पाटील हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघाचे सातव्यांदा आमदार आहेत. त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, ऊर्जामंत्रिपद तसेच विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळले आहे. अत्यंत अभ्यासू आणि नम्र लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे.