प्रविण मरगळे
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना-भाजपा मित्रपक्षाची महायुती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. राज्यात मोठा भाऊ म्हणून भाजपाने शिवसेनेला १२४ जागा देत स्वत:कडे १५० जागा घेतल्या आणि मित्रपक्ष रासपा, रयतक्रांती, आरपीआय, शिवसंग्राम यांना १४ जागा सोडण्याचं जाहीर केलं. पण प्रत्यक्षात मित्रपक्षांच्या नावे भाजपाने मित्रपक्षांच्या उमेदवारांना कमळाच्या चिन्हावर लढण्यास भाग पाडलं.
राष्ट्रीय समाज पक्षवगळता इतर मित्र पक्षांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली. ज्या २ जागा महायुतीमध्ये रासपला सोडण्यात आल्या त्याठिकाणीही भाजपाने महायुतीच्या उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म देऊन भाजपाच्या चिन्हावर लढविण्याची तयारी केली. याची कल्पना येताच महायुतीत रासप पक्ष नाराज झाला पण इकडं आड अन् तिकडं विहीर अशी परिस्थिती रासपची झाली असल्याचं महादेव जानकर यांनी मान्य केलं. युतीत राहूनही रासप आणि इतर मित्रपक्षांना नावापुरत्या जागा सोडण्यात आल्या पण प्रत्यक्षात याठिकाणी असलेले सर्व उमेदवार कमळ चिन्हावर लढणार असल्याने मित्रपक्षाच्या हाती भोपळाच आला असचं चित्र पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपात यांच्यात तडजोडीचं राजकारण झालं. अमित शहा यांनी मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत एक जागा वाढवून देण्यात आली. या भेटीतच विधानसभा निवडणुकीच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याचं दोन्ही पक्षाचे नेते सांगतात. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभुतपूर्व यशानंतर भाजपाने पुन्हा एकदा शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या काळात समसमान जागावाटप होईल असं बोलणाऱ्या शिवसेनेचाही सूर नरमल्याचं पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीत १२४ जागांवर शिवसेना, भाजपा १५० जागांवर तर मित्रपक्ष १४ जागांवर निवडणूक लढणार असून महायुती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन केली.
आरपीआयचे रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटे, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आणि रासपचे महादेव जानकर यांना १४ जागा देण्याचं आश्वासन भाजपाने दिले. मात्र या १४ जागांवरही महायुतीचे उमेदवार कमळ चिन्हावर लढणार आहेत. त्यामुळे या १४ मतदारसंघात निवडून येणारे उमेदवार हे नावापुरते मित्रपक्षांचे आमदार असतील पण प्रत्यक्षात कागदोपत्री ते भाजपाचेच आमदार म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपा १६४ तर शिवसेना १२४ अशाच प्रकारे जागांचे वाटप ग्राह्य धरता येणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना वेगवेगळे लढल्याने त्यांना प्रत्येकी १२२ आणि ६३ जागा मिळाल्या होत्या. बहुमत न मिळाल्याने भाजपाला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता चालविण्यासाठी सोबत घ्यावं लागलं.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील सभेत बहुमत नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी ५ वर्ष सरकार चालविलं असं कौतुक केलं पण आगामी निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांना पूर्ण बहुमत द्यावं असं आवाहन करत एकप्रकारे शिवसेनेला इशारा दिला होता. तरीही शिवसेनेला सोबत घेऊन जास्तीत जास्त भाजपाच्या जागा निवडून आणण्याचा हा भाजपाची खेळी आहे. त्यामुळे भाजपा आमदारांच्या संख्येत वाढ होऊन भविष्यात कमळाचं बहुमत आलं तर यापुढे शिवसेना भाजपाच्या दबावाखालीच राहील अशी पुरेपुर काळजी भाजपाच्या नेत्यांनी घेतली आहे.