Maharashtra Assembly election 2024 explained: भाजपने फसवणूक केल्याचा आरोप करीत बाहेर पडलेल्या माजी सभागृह नेता दिनकर पाटील यांनी अखेरीस मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांनी भाजपावर टीका केल्याने भाजप उमेदवार सीमा हिरे यांच्याच मतांवर त्यांचा डोळा असणार हे उघड आहे.
नाशिक पश्चिम मतदार संघात यंदा निवडणूक अधिक चुरशीची आणि अवघड होणार असे दिसते आहे. नाशिक पश्चिमच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्याऐवजी उमेदवारी मिळावी यासाठी भाजपमध्ये तब्बल १५ इच्छुक होते.
भाजपची मते घेण्याचा धोका
त्यातील उद्योजक प्रदीप पेशकार आणि मयूर अलई वगळता अन्य इच्छुकांनी प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यावेळी त्यांनी सीमा हिरे यांना सोडून कोणालाही उमेदवारी द्या, असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात मात्र, या बंडखोरांमध्ये एकमत नव्हतेच.
साहजिकच दिनकर पाटील यांनी आपल्या प्रभागात बोलावलेल्या मेळाव्याला त्यांच्याबरोबर पत्रकार परिषद घेऊन सीमा हिरे यांना विरोध करणारे कोणीच नव्हते. आपल्या समर्थकांच्या बैठकीत पाटील यांनी भाजपने आपल्याला स्थायी समिती सभापती, महापौर, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी आणि आमदारकी असे अनेक शब्द दिले मात्र, प्रत्यक्षात फसवणूक केली असे सांगतानाच त्यांनी सीमा हिरे यांनी आपल्या पुत्राच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केल्याची आठवण करून दिली.
सीमा हिरेंना विरोध
सीमा हिरेंना विरोध एकूणच भाजप आणि सीमा हिरे यांच्या विरोधात त्यांचा रोष आहेच, त्यांनी बंडखोरी करतानाच मनसेत प्रवेश केला. तूर्तास मनसेची भूमिका ही भाजपाप्रमाणेच हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे पाटील हे अधिक मते भाजपाची घेणार किंबहुना तीच पाटील यांची व्यूहरचना असल्याचे दिसते आहे.
दशरथ पाटीलही मैदानात
माजी महापौर दशरथ पाटील स्वराज्य पक्षात माजी महापौर दशरथ पाटील यांनी अखेरीस गुरुवारी (दि. २४) पुणे येथे महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केला. पक्षाचे प्रमुख राजे संभाजी छत्रपती यांच्या हस्ते दशरथ पाटील यांना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचे पत्र म्हणजे एबी फॉर्म देण्यात आला आहे.
दशरथ पाटील हे सुरुवातीला शिवसैनिक होते. शिवसेनेचे महापौर म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यानंतर त्यांनी शिवसेनेकडूनच लोकसभा आणि विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. त्याचप्रमाणे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातूनही त्यांनी निवडणूक लढविली होती. दशरथ पाटील हे नुकतेच मनसेत प्रविष्ठ झालेल्या दिनकर पाटील यांचे सख्खे बंधु आहे. त्यामुळे एकाच मतदारसंघात दोघा बंधुंची लढत होणार आहे.