गुवाहाटी - स्पष्ट बहुमतासह केंद्रात सत्ता आणि विविध राज्यांत सरकारे स्थापन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला कसे रोखायचे, याबाबत विरोधी पक्षांमध्ये सातत्याने चर्चा सुरू असते. दरम्यान, भाजपाची आगेकूच रोखण्यासाठी महाराष्ट्रात करण्यात आलेली महाविकास आघाडी कमालीची यशस्वी ठरली आहे. दरम्यान, आता महाराष्ट्रातील हा फॉर्म्युला काँग्रेसने देशातील इतर राज्यांतही वापरण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने पूर्वोत्तर भारतातील मोठे राज्य असलेल्या आसाममध्येभाजपाला रोखण्यासाठी महाआघाडी आकारास आणली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील या महाआघाडीत एकूण पाच पक्ष सहभागी झाले असून, यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत.२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी स्थापन करत सत्तेमधून दूर ठेवले होते. त्यानंतर गेल्या वर्षभरात महाविकास आघाडीने विविध निवडणुकांत भाजपाला एकीच्या बळाचा दणका देण्यात यश मिळवले आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता आसाममध्ये महाआघाडीचा घाट घातला आहे. आसाममध्ये काँग्रेस, एआययूडीएफ, सीपीआय, सीपीएम, सीपीआय (एमएल) आमि आंचलिक गण मोर्चा असे सहा पक्ष एकत्र आले आहे. या सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.काँग्रेस आणि बदरुद्दीन अजमल यांच्या एआययूडीएफ या पक्षांनी पुढाकार घेत ही आघाडी केली आहे. तसेच या आघाडीमध्ये काही डावे पक्षसुद्धा सहभागी होणार आहे. आसामच्या जनतेच्या हितासाठी हे सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. आता अन्य भाजपाविरोधी पक्षांनीही आपल्यासोबत या महाआघाडीमध्ये यावे, असे आवाहन या पक्षांच्या नेत्यांनी केले आहे.दरम्यान, २०१६ मध्ये झालेल्या आसाम विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने १२६ पैकी ६० जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाचे मित्र पक्ष असलेल्या आसाम गण परिषदेने १४ आणि बोडोलँड पीपल्स फ्रंटने १२ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला २६ जागा मिळाल्या होत्या. बदरुद्दीन अजमल यांच्या पक्षाला १३ जागा मिळाल्या होत्या. तर डाव्या पक्षांना भोपळाही फोडता आला नव्हता.
भाजपाला रोखण्यासाठी महाराष्ट्र फॉर्म्युला, काँग्रेसने या राज्यात पाच पक्षांसोबत केली महाआघाडी
By बाळकृष्ण परब | Published: January 20, 2021 4:05 PM
Congress Politics News : भाजपाची आगेकूच रोखण्यासाठी महाराष्ट्रात करण्यात आलेली महाविकास आघाडी कमालीची यशस्वी ठरली आहे. आता महाराष्ट्रातील हा फॉर्म्युला काँग्रेसने देशातील इतर राज्यांतही वापरण्यास सुरुवात केली आहे.
ठळक मुद्देकाँग्रेसने आता आसाममध्ये महाआघाडीचा घाट घातला आहेआसाममध्ये काँग्रेस, एआययूडीएफ, सीपीआय, सीपीएम, सीपीआय (एमएल) आमि आंचलिक गण मोर्चा असे सहा पक्ष एकत्र आले आहेकाँग्रेस आणि बदरुद्दीन अजमल यांच्या एआययूडीएफ या पक्षांनी पुढाकार घेत ही आघाडी केली आहे