मुंबई - पावसाळ्याची चाहूल लागून शेतीमधील खरिपाचा हंगाम जवळ येताच शेतीच्या प्रश्नांवरून राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपानेही शेतीच्या प्रश्नांबाबत आग्रही भूमिका घेत मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी केली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मशागतीच्या कामांसाठी दहा हजार रुपयांचे सरसकट रोख अनुदान तातडीने द्यावे, अशी मागणी भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
केशव उपाध्ये यांनी ट्विटच्या माध्यामातून सरकारसमोर या मागण्या मांडल्या आहेत. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये केशव उपाध्ये म्हणाले की, तब्बल १४ हजार ७७५ कोटींच्या खत अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय घेऊन मोदी सरकारने देशातील कोट्यवधी शेतकरी कुटुंबांना दिलासा दिला आहे. आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मशागतीच्या कामांसाठी दहा हजार रुपयांचे सरसकट रोख अनुदान तातडीने द्यावे, अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली.
दरवर्षी काळाबाजार, साठेबाजी आणि आर्थिक अडवणूक यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेएवढे खत राज्यात उपलब्ध होत नाही. गेल्या वर्षीही खताच्या कृत्रिम टंचाईमुळे शेतकरी नाडला गेला होता. तशी वेळ येऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने खत वितरणाची प्रणाली आखून द्यावी, अशी मागणीही केशव उपाध्ये यांनी केली.
केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान योजनेअंतर्गत २० हजार ६६७ कोटींचा निधी जमा केला असून त्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांस झाला आहे. आता खतांच्या दरवाढीचा बोजा उचलून मोदी सरकारने शेतकऱ्याच्या शिरावरील भार हलका केला आहे. आता राज्य सरकारने १० हजार रूपये द्यावेत, असा सल्लाही केशव उपाध्ये यांनी सरकारला दिला.