सांगली – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत, या निवडणुकीच्या निकालांमध्ये गावकऱ्यांनी अनेक धक्कादायक निकाल दिले आहेत, यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनाही त्यांच्या सासरवाडीच्या गावकऱ्यांनी मोठा धक्का दिला आहे. सांगलीतील म्हैसाळ ग्रामपंचायतीत भाजपानं तब्बल १५ जागांवर विजय मिळवला आहे.
म्हैसाळ ही जयंत पाटील यांची सासरवाडी आहे, याठिकाणी भाजपानं मुसंडी मारत राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड दिली आहे. १७ जागांपैकी १५ जागांवर भाजपानं एकतर्फी विजय मिळवला आहे. तर केवळ २ जागांवर राष्ट्रवादीला समाधान मानावं लागलं आहे. जयंत पाटील यांचे मेव्हणे मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती, मात्र लहान मेव्हणा, मोठ्या मेव्हण्याची पत्नी अन् मुलगी हे सगळेच पाहुणे पराभूत झाले आहेत. या निवडणुका स्थानिक पातळीवरील असल्या तरी जयंत पाटलांचे सर्वच पाहुणे पराभूत झाल्याने गावात चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान, दुसरीकडे भाजपा नेते आशिष शेलार यांनी सासरवाडीत भाजपाची लाज राखली आहे. सिंधुदुर्गात सावंतवाडी तालुक्यातील दांडेली ग्रामपंचायत शिवसेनेकडून हिसकावून घेण्यात भाजपला यश आहे. दांडेली या गावात भाजपाचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांची सासरवाडी असून दांडेली ग्रामपंचायत बरीच वर्षे शिवसेनेकडे होती मात्र यावेळी ती ग्रामपंचायत भाजपाकडे आली आहे. भाजपा नेते आशिष शेलार स्वत: या ठिकाणी प्रचारासाठी आले होते. त्यामुळेच या ग्रामपंचायतवर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.
राज्यातील सहा हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये कमळ फुलेल– भाजपा
राज्यातील १४ हजारांपैकी सुमारे सहा हजार ग्रामपंचायतींवर भाजपाला यश मिळेल, संध्याकाळपर्यंत हा आकडा वाढेल, या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर केला, कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जाते. मात्र या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला चांगले मतदान झालेले दिसत आहे. उदाहरणच द्यायचं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या आहेत. अगदी शिवसेनेच्या खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावामध्येही भाजपाने विजय मिळवला आहे, देवगड, वैभववाडी, मालवण आदी तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचा विजय झाला आहे अशी प्रतिक्रिया भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केली.
भास्कर पेरे पाटलांच्या मुलीला गावकऱ्यांनी नाकारलं
आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा खंडीत झाली, या निवडणुकीत आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनेलला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे यांनाही गावकऱ्यांनी नाकारलं आहे. अनुराधा पाटील यांना १८३ मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला २०८ मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला. पाटोदा ग्रामपंचायतील ८ सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत, तर उर्वरित ३ जागांसाठी मतदान घेण्यात आलं, त्यातील एका जागेवर अनुराधा पाटील उभ्या होत्या.