"ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला ८० टक्के जागा, भाजपाची मोठी पीछेहाट"
By बाळकृष्ण परब | Published: January 18, 2021 05:28 PM2021-01-18T17:28:35+5:302021-01-18T17:31:21+5:30
Maharashtra Gram Panchayat Election Results : राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज राज्यातील विविध भागांत सुरू आहे. या मतमोजणीचे बहुतांश कल आता स्पष्ट होत आहेत.
मुंबई - राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज राज्यातील विविध भागांत सुरू आहे. या मतमोजणीचे बहुतांश कल आता स्पष्ट होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमधील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या निकालांबाबत मोठा दावा केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील पक्षांना ८० टक्के जागा मिळाल्या आहेत, असा दावा थोरात यांनी केला आहे.
ग्रामपंचायत निकालांवर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील पक्षांना संपूर्ण राज्यात मिळून ८० टक्के जागा मिळताना दिसत आहेत. गेल्या वर्षभरात महाविकास आघाडीने सरकारच्या माध्यमातून केलेल्या कामावर जनतेने या निकालांच्या माध्यमातून शिक्कामोर्तब केले आहे. जनता आमच्या कामावर समाधानी आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे.
या निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीबाबतही थोरात यांनी समाधान व्यक्त केले आहे. काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने खूप चांगली कामगिरी केली आहे. तसेच या निवडणुकीत राज्यभारत मिळून काँग्रेसला चार ते साडेचार हजार ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळेल असा दावाही बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
दरम्यान, या निवडणुकीच्या निकालांवरून बाळासाहेब थोरात यांनी भाजपाला टोला लगावला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाची मोठी पीछेहाट झाली आहे. भाजपाची पीछेहाट हेच या ग्रामपंचायत निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे. स्वत: चंद्रकांत पाटील हे स्वत:च्या गावाच ग्रामपंचायत राखू शकले नाहीत, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.