मुंबई : देशाचा गुन्हे दर वाढत असताना महाराष्ट्रातील गुन्ह्यांचा दर २०१८-१९ च्या तुलनेत तेवढाच राहिला असून महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रापेक्षा केरळ, तेलंगणा, मध्य प्रदेश, हरयाणा, राजस्थान या राज्यांचा गुन्हे दर अधिक असल्याचा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.
राज्यात गुन्हे सिद्ध होण्याचे तसेच शिक्षेचे प्रमाण वाढले असून २०१८ मध्ये हा दर ४१.४१ होता तो २०१९ मध्ये ४९ टक्के झाला आहे. त्यामध्ये राज्य अकराव्या क्रमांकावर आहे. कर्नाटक (३६.६), मध्य प्रदेश (४७), गुजरात (४५.६), तेलंगणा (४२.५) असे प्रमाण आहे.२०१९ मध्ये खुनासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये देशाचा गुन्हे दर २.२ होता, तर महाराष्ट्राचा गुन्हे दर केवळ १.७ असून महाराष्ट्र राज्य २५ व्या क्रमांकावर होते. तर खुनाचा प्रयत्न संदर्भातील गुन्ह्यांबाबत महाराष्ट्राचा १७ वा क्रमांक आहे. देशात २०१९ मध्ये अवैध हत्यार बाळगण्याच्या प्रकरणात महाराष्ट्राचा ९ वा क्रमांक आहे. राज्यात केवळ ९१० गुन्ह्यांची नोंद आहे. उत्तर प्रदेश (२५,५२४), मध्य प्रदेश (३,८४७), बिहार (२,९७६), राजस्थान (२,०९५) गुन्हे नोंद आहेत.परिचितांकडूनच होतात महिलांवर लैंगिक अत्याचार२०१९ मध्ये बलात्काराचे राजस्थानमध्ये ५,९९७, उत्तर प्रदेशमध्ये ३,०६५, मध्य प्रदेशमध्ये २,४८५ आणि महाराष्ट्रात २,२९९ असे गुन्हे नोंदविण्यात आले. त्यापैकी २,२७४ गुन्हेगार हे पीडितांचे परिचित, नातेवाईक, मित्र, शेजारी आहेत; तर केवळ २५ जण अनोळखी आहेत.त्यामध्ये महाराष्ट्राचा गुन्हे दर ३.०९ असून महाराष्ट्र २२ व्या क्रमांकावर आहे. इतर राज्यांचा गुन्हे दर केरळ (११.६), हिमाचल प्रदेश (१०), हरयाणा (१०.९), झारखंड (७.७) व मध्य प्रदेश (६.२) असा आहे.