मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून वादास सुरुवात झाल्यापासून बिहार पोलिसांचे तत्कालीन डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचे नाव बरेच चर्चेत होते. दरम्यान, बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येताच गुप्तेश्वर पांडे यांनी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देत थेट राजकारणात उडी घेतली होती. मात्र पांडे यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट देण्यास भाजपाने नकार दिला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावरून भाजपाला सणसणीत टोला लगावला आहे.
"गुप्तेश्वर पांडे यांना भाजपाने उमेदवारी द्यावी की नाही हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. भाजपाचे नेते पांडेंचा प्रचार करणार का? असा प्रश्न आम्ही विचारला होता. त्याचं उत्तर भाजपाकडे नसावं. त्याच भीतीतून त्यांनी पांडेंना तिकीट नाकारलं असावं" असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. जेडीयूने तिकीट न दिल्याने नोकरीही गेली आणि विधानसभेची उमेदवारीही गेली, अशी अवस्था झालेल्या गुप्तेश्वर पांडेंना आता भाजपाचा आधार मिळू शकतो असं म्हटलं जातं होतं.
गुप्तेश्वर पांडे बिहारचे डीजीपी होते, पण भाजपाच्या नेत्यासारखे बोलायचे, गृहमंत्र्यांची खोचक टीका
गुप्तेश्वर पांडे यांच्यावर अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीही निशाणा साधला होता. "बिहारचे माजी डीडीपी गुप्तेश्वर पांडे बिहारचे एक वरिष्ठ अधिकारी होते. गेल्या दीड- दोन महिन्यापासून आपण त्यांना पाहत होतो. ते असे बोलायचे की त्यांच्या बोलण्यातून ते भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत, असे वाटत होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असे बोलणे उचित नव्हते. याचबरोबर, गुप्तेश्वर पांडे ज्या प्रकारे बोलायचे, ज्या प्रकारची त्यांची वक्तव्यं असायची, त्यावरून तरी ते भाजपा नेते आहेत, असे जाणवत होते. आता राजीनामा दिल्यानंतर ते भाजपाच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या विधानांचा अंदाज येतो" असं अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं.
पांडे यांचं काय होणार रंगली चर्चा
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आक्रमक असलेले गुप्तेश्वर पांडे पोलीस सेवेतून अचानक स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात आले होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत दणक्यात जेडीयूमध्ये प्रवेश केल्याने त्यांना विधानसभेचे तिकीट मिळणार हे नक्की मानले जात होते. मात्र आता ही शक्यता मावळताना दिसत आहे. कारण जेडीयूने पांडे यांना तिकीट दिलेलं नाही. जेडीयूने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या 115 उमेदवारांच्या यादीत गुप्तेश्वर पांडे यांचं नावच नसल्याने आता पांडे यांचं काय होणार याची चर्चा रंगली आहे.