मुंबई - विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव सोमवारी सभागृहात बोलत असताना विरोधी बाकावरील सदस्यांनी अभूतपूर्व गदारोळ घातला. अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न झाला. ते बोलत असलेला माइक ओढला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यावर उपाध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना आई-बहिणीवरून शिवीगाळ केली गेली. या सगळ्या प्रकारामुळे अखेर भाजपाच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. या 12 पैकी चौघे माजी कॅबिनेटमंत्री राहिले आहेत. याच दरम्यान भाजपाने आता ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
"वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू" असं म्हणत भाजपाने हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकार (Thackeray Government) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "दोन दिवसीय विधिमंडळ अधिवेशनात काल सोमवारी नियोजित बनाव रचून माझ्यासह भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले. या दंडेली विरुद्ध कांदिवली पूर्व विधानसभेत संतप्त निदर्शने करण्यात आली. वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू" असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे; १७० आमदार पाठीशी असून इतकेही बळ नसेल तर उपयोग काय?"
"ज्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात अर्वाच्च शिवीगाळ केली त्यांनीच माझ्यासह भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केले. शकुनीने कपटाने फासे टाकलेत, पण जनता उघड्या डोळ्यांनी सर्व काही पाहते आहे. आज लोकांनी रस्त्यावर उरतून वसूली सरकार आणि घरबशा मुख्यमंत्र्यांचा उत्स्फूर्त निषेध केला" असं देखील अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. याआधीही भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधीमंडळ अधिवेशनापूर्वी पत्रकारांना संबोधित करण्याचे धाडस झालेले नाही. 170 आमदार पाठीशी असून इतकेही बळ नसेल तर उपयोग काय? यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे…." असं अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
"आमदारकी गेली तर चालेल, रस्त्यावर संघर्ष सुरूच राहील; निलंबन म्हणजे ठाकरे सरकारची हिटलरशाही"
भाजपाचे आमदार राम सातपुते (BJP Ram Satpute) यांनी "आम्ही शिवीगाळ केलेली नाही. एक कथा रचून आमचं निलंबन करण्यात आलं. पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. आमदारकी गेली तरी चालेल. पण जनतेच्या प्रश्नांसाठी लढतच राहणार. बारा आमदारांचं निलंबन म्हणजे ठाकरे सरकारची हिटलरशाही" असं म्हटलं आहे. तसेच सातपुते यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनही याबाबत ट्विट केलं आहे. "ओबीसी आरक्षणासाठी लढताना आमचे एक वर्षांसाठी निलंबन झाले... आम्ही सरकारच्या हिटलर प्रवृत्तीचा निषेध करतो" असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.