मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं दिसून आलं. यातच विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या धक्काबुक्की प्रकारावरून भाजपाच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
१ वर्ष निलंबन झालेल्या आमदारांमध्ये आशिष शेलार(Ashish Shelar) यांचाही समावेश आहे. याबाबत आशिष शेलार म्हणाले की, तालिबानी संस्कृतीला लाजवेल असं ठाकरे सरकार वागत आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या रुपाने नवे तालिबानी महाराष्ट्रावर राज्य करू पाहत आहे. भाजपाच्या कोणत्याही आमदाराने भास्कर जाधवांना शिवीगाळ केली नाही. तालिका अध्यक्षांना कुठेही धक्काबुक्की झाली नाही. ओबीसी आरक्षणात बोलू न दिल्याने संविधानिक त्रागा करणाऱ्या सदस्यांना जागेवर बसवण्याचं मी केलं. उपाध्यक्षांच्या दालनात शिवीगाळ करणारे सदस्य भाजपाचे नव्हते. तरी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना असं वाटत असेल तर पक्षाच्या वतीने क्षमा मागतो असं आम्ही सांगितले. परंतु तालिबानी सरकारने आमच्या आमदारांवर कारवाई केली. “माझा ‘सामना’ करण्याची ताकद शिवसेनेत नाही. नो बॉलमध्ये विकेट काढण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. परंतु मी क्रिकेटमधला खेळाडू आहे. दोन्ही हातांनी बॉलिंग करून सभागृहाबाहेर तुमची पळता भुई करून टाकेन” असा इशारा आशिष शेलारांनी दिला आहे.
सत्ताधाऱ्यांनी रचलं षडयंत्र
ओबीसी आरक्षणावरून सरकारची कोंडी होत असल्याचं कळताच सत्ताधाऱ्यांनी एक षडयंत्र रचलं. ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचं नाही यासाठी हा सगळा प्रयत्न सुरू आहे. २०२२ च्या निवडणुकीपर्यंत ओबीसींना आरक्षण न देण्याचा डाव आहे. सभागृहात विरोधकांचं संख्याबळ कमी व्हावं यासाठी सत्ताधाऱ्यांनी षडयंत्र रचण्यात आलं. त्यानंतर भाजपाच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन करण्यात आलं असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी केला.
तसेच ओबीसी आरक्षणासाठी १०६ आमदारांना निलंबित केले तरी संघर्ष सुरूच राहील. १ वर्ष नाही तर ५ वर्षही निलंबन झालं तरी पर्वा करणार नाही. सभागृहात याआधीही असा गोंधळ झाला परंतु निलंबन झालं नाही. एकाही भाजपा सदस्याने शिवीगाळ केली नाही. शिवीगाळ करणारे कोण होते? हे सगळ्यांनी बघितलं. शिवसेनेचे सदस्य आक्रमक झाले त्यालाही भाजपा आमदाराने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु तेव्हाही आम्ही शांत बसलो. दालनात विषयावर चर्चा झाली. तरीही सभागृहात पुन्हा हा विषय आणून विरोधकांचे संख्याबळ कमी करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांची संख्या कमी केली तर विरोधक हावी होणार नाहीत अशी भीती सरकारला आहे. जी शंका होती ती खरी ठरली असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
निलंबन झालेल्या आमदारांची नावे-
१. संजय कुटे
२. आशिष शेलार
३. गिरीश महाजन
४. पराग अळवणी
५. राम सातपुते
६. अतुल भातखळकर
७. जयकुमार रावल
८. हरीश पिंपळे
९. योगेश सागर
१०. नारायण कुचे
११. कीर्तीकुमार (बंटी) बागडिया
१२. अभिमन्यू पवार