मुंबई – विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी भाजपा सरकारविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. MPSC तरूण स्वप्निल लोणकर याच्या आत्महत्येचे पडसाद विधिमंडळात पाहायला मिळाले. भाजपा आमदार राम सातपुते यांनी या प्रश्नावर विधानभवन परिसरात आंदोलन करून सरकारचा जोरदार निषेध केला.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राम सातपुते म्हणाले की, वरळी केम छो बोलणं सोप्पं आहे. पण विद्यार्थ्यांवर बोलायला वेळ नाही. हे सरकार निर्लजम्म सदासुखी आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या मुलाखती झाल्यात त्यांना नियुक्त्या द्या. विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता नाही. यांना केवळ त्यांच्या लेकराबाळांची चिंता आहे. विद्यार्थ्यांची यांना काही देणं घेणं नाही. सरकारला फक्त वसुली चालली पाहिजे. वाझेसारखे अधिकारी जगले पाहिजेत, विद्यार्थी मेले पाहिजेत, हे सरकार पळपुटे आहे. हेच त्यांचे धोरण आहे अशी टीका त्यांनी केली.
त्याचसोबत लाखो विद्यार्थ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. काहीतरी नाटकं करून विलंब करत आहे. पार्थ पवार, रोहित पवार, आदित्य ठाकरे यांची चिंता सरकारला आहे. २ दिवसांचे अधिवेशन घेतले. सरकार तोंडावर पुस्तक मारायला आणली आहेत. ठाकरे सरकारनं विद्यार्थ्यांचे वाटोळे केले आहेत. विद्यार्थी आत्महत्या करतंय पण सरकार गप्प बसलंय. विद्यार्थी दिवसभर राबराब करतात. स्वप्निलची आत्महत्या नसून सरकारच्या कुचकामी धोरणानं केलेली हत्या आहे. ४१३ विद्यार्थी MPSC परीक्षा पास होऊन नियुक्त्या नाहीत. स्वत:ची लेकरंबाळ आमदार, खासदार झाली पाहिजेत मग महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे काय? असा सवाल आमदार राम सातपुते यांनी विचारला.
काय आहे प्रकरण?
स्वप्निल लोणकर या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्वप्निलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बाईंडिंगचा प्रिटिंग प्रेसचा छोटा व्यवसाय आहे. ते व त्यांची पत्नी असे दोघे हा व्यवसाय पाहतात. स्वप्निलने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. स्वप्निलचे आईवडिल हे नेहमीप्रमाणे बुधवारी (३० जून) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडेचार वाजता घरी आली. तेव्हा स्वप्निलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने हा प्रकार आईवडिलांना कळविला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
स्वप्निलचे शिक्षण पूर्ण झाल्यापासून तो एमपीएससीच्या(MPSC) परीक्षेची तयारी करीत होता. तो २०१९ च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे त्याची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्वपरीक्षा तो उत्तीर्ण झाला होता. वाढते वय आणि नोकरी करूनही कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या ‘सुसाईड नोट’वरून दिसून येत आहे.