मुंबई - ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत सुरू झालेल्या चर्चेचं पर्यवसान आधी शाब्दिक वादात, आरोप-प्रत्यारोपात, नंतर गदारोळात आणि पुढे अक्षरशः राड्यात झालं. शेवटी, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या 12 आमदारांवर एक वर्षाच्या निलंबनाच्या कारवाई करण्यात आली. संजय कुटे, आशिष शेलार, गिरीश महाजन, पराग अळवणी, राम सातपुते, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, हरीश पिंपळे, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तीकुमार (बंटी) बागडिया, अभिमन्यू पवार या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. याच दरम्यान भाजपाने ठाकरे (Thackeray Government) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"आमदारकी गेली तर चालेल; रस्त्यावर संघर्ष सुरूच राहील" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे आमदार राम सातपुते (BJP Ram Satpute) यांनी "आम्ही शिवीगाळ केलेली नाही. एक कथा रचून आमचं निलंबन करण्यात आलं. पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. आमदारकी गेली तरी चालेल. पण जनतेच्या प्रश्नांसाठी लढतच राहणार. बारा आमदारांचं निलंबन म्हणजे ठाकरे सरकारची हिटलरशाही" असं म्हटलं आहे. तसेच सातपुते यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनही याबाबत ट्विट केलं आहे. "ओबीसी आरक्षणासाठी लढताना आमचे एक वर्षांसाठी निलंबन झाले... आम्ही सरकारच्या हिटलर प्रवृत्तीचा निषेध करतो" असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ओबीसी आरक्षणासाठी 12 काय 106 आमदारही पणाला लावू , अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन करण्याचा ठराव संमत झाला आहे. त्यानंतर, फडणवीसांनी भूमिका मांडली. शिवसेना आमदार आणि इकडच्या आमदारांमध्ये बाचाबाची झाली होती. आम्ही रागात होतो, अध्यक्ष महोदय हे जरुर खरं आहे, तेथे बाचाबाची झाली. आम्ही त्याचठिकाणी आम्ही तुमची माफी मागितली. त्यामुळे, यासंदर्भात विरोधकांना बोलावून आमच्याशी चर्चा करायला हवी, जाणून बुजून विरोधकांच्या सदस्यांची संख्या कमी करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
“सरकारच्या तोंडावर MPSC ची पुस्तकं फेकून मारतो मग कळेल”
राम सातपुते यांनी याआधी विधानभवन परिसरात आंदोलन करून सरकारचा जोरदार निषेध केला होता. राम सातपुते म्हणाले की, वरळी केम छो बोलणं सोप्पं आहे. पण विद्यार्थ्यांवर बोलायला वेळ नाही. हे सरकार निर्लजम्म सदासुखी आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या मुलाखती झाल्यात त्यांना नियुक्त्या द्या. विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता नाही. यांना केवळ त्यांच्या लेकराबाळांची चिंता आहे. विद्यार्थ्यांची यांना काही देणं घेणं नाही. सरकारला फक्त वसुली चालली पाहिजे. वाझेसारखे अधिकारी जगले पाहिजेत, विद्यार्थी मेले पाहिजेत, हे सरकार पळपुटे आहे. हेच त्यांचे धोरण आहे अशी टीका त्यांनी केली.
त्याचसोबत लाखो विद्यार्थ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. काहीतरी नाटकं करून विलंब करत आहे. पार्थ पवार, रोहित पवार, आदित्य ठाकरे यांची चिंता सरकारला आहे. 2 दिवसांचे अधिवेशन घेतले. सरकार तोंडावर पुस्तक मारायला आणली आहेत. ठाकरे सरकारनं विद्यार्थ्यांचे वाटोळे केले आहेत. विद्यार्थी आत्महत्या करतंय पण सरकार गप्प बसलंय. विद्यार्थी दिवसभर राबराब करतात. स्वप्निलची आत्महत्या नसून सरकारच्या कुचकामी धोरणानं केलेली हत्या आहे. 413 विद्यार्थी MPSC परीक्षा पास होऊन नियुक्त्या नाहीत. स्वत:ची लेकरंबाळं आमदार, खासदार झाली पाहिजेत मग महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे काय? असा सवाल आमदार राम सातपुते यांनी विचारला.